बार्शी- अमर रहे.. अमर रहे..सुभेदार रामराव मोरे अमर रहे..या घोषणेच्या निनादात पानगाव (ता. बार्शी) येथे शहीद सुभेदार रामराव मोरे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी लष्कराच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. या वेळी लष्करातील व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
उत्तर सिक्कीममध्ये कर्तव्य बजावत असताना 17 जून रोजी रामराव मोरे शहीद झाले होते. पुणे येथून शुक्रवारी सकाळी लष्करी वाहनातून त्यांचे पार्थिव पानगाव येथे आणण्यात आले. या वेळी गावकर्यांचे अर्शू अनावर झाले. गावानजीकच्या स्मशानभूमीत पार्थिव नेण्यात आले. तेथे लष्करातील आजी माजी अधिकारी यांनी तसेच शासनाच्या वतीने पालकमंत्री दिलीप सोपल, नायब तहसीलदार नागेश गायकवाड यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
अंत्यसंस्कारावेळी लष्कराच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. या वेळी पालकमंत्री दिलीप सोपल, उपसभापती केशव घोगरे, भाऊसाहेब आंधळकर यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी पोलिस उपअधीक्षक रोहिदास पवार, नगरसेवक विजय राऊत, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय कदम, विठ्ठल आवारे, विकास पाटील, सुधीर काळे, उत्तम शिंदे, बाबा कापसे तसेच महसूल मंडल अधिकारी एस. पी. भोसले, तलाठी सी. पी. वदूलवाड, विष्णू कांबळे यांच्याबरोबरच गावकरी व पंचक्रोशीतील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सकाळी सात वाजता फुलांनी सजवलेल्या रथातून मोरे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी गावातील सर्व व्यवहार बंद होते.