सोलापूर- ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिराला अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचे रूपडे देण्यासाठी मास्टरप्लॅन तयार करावा लागेल. तलावातील पाण्याच्या स्वच्छतेचे उपाय केले तरच ‘सुवर्ण सिद्धेश्वर मंदिर’ शक्य आहे.
हे काम केवळ मंदिर समिती, मनपा, तलाव सुधारणा समितीचे नाही. कल्पना आणि संकल्पासाठी त्यांचा सुकाणू (थिंक टँक) समिती नेमू, यासाठी विशेष बैठक घेण्याचे सूतोवाच श्री सिद्धरामेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी ‘दिव्य मराठी’च्या ‘टॉक शो’मध्ये शनिवारी केले.
"दिव्य मराठी’च्या कार्यालयात ‘सुवर्ण सिद्धेश्वर’ या विषयावर सायंकाळी "टॉक शो’ आयोजित केला होता. ‘सुवर्ण सिद्धेश्वर’ संकल्पनेने सोलापूरकरांच्या हृदयाचा ठाव घेतला आहे. सिद्धरामेश्वर मंदिर विकास लोकभावना आहे. ‘दिव्य मराठी’ने सोलापूरचे धार्मिक पर्यटनस्थळ देशाच्या नकाशावर कसे नेता येईल, याची दृष्टी दिली आहे. थिंक टँकमार्फत कामाचे टप्पे ठरवून घेतल्यास लोकवर्गणीतून सोलापूरचा कायापालट होईल, अशी अनुकूल मतांची मांडणी झाली. कृतीसाठी महिनाअखेरपर्यंत बैठक घेऊ, असे काडादी मनपा आयुक्त गुडेवार यांनी सांगितले. संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरल्यास सोलापूर जगाच्या नकाशावर येईल, अशी अपेक्षाही मान्यवरांनी मांडली.