आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटकेतील मटकाकिंग सायंकाळी घरी; फार्स जारीच, सर्मथकांच्या गराड्यात विजापुरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- आकड्यांचा जुगार चालवणार्‍या मटका बुकींविरुद्ध जुजबी कारवाईचा कित्ता पोलिस प्रशासनाने बुधवारी गिरवला. पूर्वभागात मटका जुगाराचा बुकी असलेला आणि मटकाकिंग म्हणून ओळखला जाणारा हयात बिजापुरे (वय 48, रा. साखर पेठ) यास पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत अटक केली. न्यायालयात त्यास उभे केला असता 15 दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले. यापूर्वी पाच बुकींना अटक झाली होती. त्यांनाही अशीच किरकोळ कलमे लावून हद्दपार करण्यात आले आहे.

सकाळी अटक झालेला विजापुरे सायंकाळी सर्मथकांसह सायंकाळी घरीही परतला. दरम्यान, कायदेतज्ज्ञांनी जुगार चालवणार्‍यांविरुद्ध 420 (फसवणूक), 120 (ब) संगनमत करणे असे गंभीर गुन्ह्यांची कलमे लावता येतात, असे स्पष्ट केले आहे. मात्र, सहाही बुकींच्या विरुद्ध 151 असे किरकोळ कलम लावले आहे. ‘दिव्य मराठी’ने ‘मटकामुक्त सोलापूर’ ही मालिका 26 सप्टेंबरपासून सुरू केली. सलग चौदा दिवस ही मालिका सुरू आहे.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस उपायुक्त पी.आर.पाटील, साहाय्यक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती, पोलिस निरीक्षक नितीन कौसडीकर यांनी केली. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास विजापुरे यास जेल रोड पोलिस ठाणे हद्दीत अटक झाली. शासकीय रुग्णालयात तीन तासांच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्यास जेल रोड पोलिस ठाण्याच्या पोलिसांकडे पाठवण्यात आले. तेथे विजापुरे यास कोठडीत बसविण्यात आले. दुपारी पावणेतीन वाजता त्याला न्यायालयात हजर केले.

पोलिस आयुक्तांनाही आहेत कारवाईचे अधिकार
मटका चालवणे हे समाजविघातक कृत्य आहे. असे कृत्य केल्याने समाजास धोका होऊ शकतो. अशा व्यक्तींना समाजात राहण्याचा अधिकार नसतो. अशांना एक वर्षापर्यंत शहरातून हद्दपार करता येऊ शकते. तसे अधिकार पोलिस आयुक्तांना आहेत. आताही ते मटका बुकीचालकांना एक वर्षापर्यंत हद्दपार करू शकतात.

लावलेले कलम कडक आहेत
मटका बुकीचालक हयात विजापुरे यांच्यावर लावलेले 151 (3) हा कलम साधे नसून कडक आहे. यापूर्वी त्यांच्यावर जुगार कायद्यान्वे कलम लावले होते, तशी कारवाई सुद्धा झालेली आहे.’’ अनिल दबडे, पोलिस निरीक्षक, जेलरोड

किमान वर्षापर्यंत हद्दपार करता येते
मुंबई पोलिस कायद्यानुसार समाजविघातक कृत्य करणार्‍या व्यक्तींना पोलिस आयुक्त स्वत:एक वर्षापर्यंत हद्दपार करू शकतात. मटका चालवणे हे असेच कृत्य आहे. त्यासाठी हद्दपार आताही करता येते.’’ अँड. संतोष न्हावकर