आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणित अधिवेशनात बेरजेचे राजकारण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मला शालेय अभ्यासक्रमातील गणितं कधी जमली नाहीत. पण राजकीय गणितं सोडविण्यात माझा हातखंडा आहे. नवीन वर्षातील माझे गणित (विधानसभा निवडणूक) शिक्षकांनीच सोपे करावे, असे आवाहन सोलापूर दक्षिणचे आमदार दिलीप माने यांनी केले. शैक्षणिक व्यासपीठावर राजकीय बेरजेच्या गणिताची चर्चा चांगलीच रंगली.

सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे सातवे वार्षिक अधिवेशन गुरुवारी शिवछत्रपती रंगभवन सभागृहात झाले. आमदार माने यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. या वेळी शिक्षक आमदार भगवानराव साळुंके, दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या सभापती इंदुमती अलगोंडा-पाटील, शिक्षणाधिकारी विद्या शिंदे, पुणे बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे, मुख्याध्यापक संघाचे राज्याध्यक्ष सुभाष माने, गट शिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, गणित संघाचे अध्यक्ष शिवशरण बिराजदार आदी उपस्थित होते. आमदार मानेंनी केलेल्या राजकीय पार्श्वभूमीच्या भाषणबाजीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीतील राजकीय गणित व आडाख्यांची दिवसभर अधिवेशनामध्ये चर्चा होती.

दक्षिण सोलापूर तालुका गणित अध्यापक मंडळाने आयोजिलेल्या अधिवेशनात याप्रसंगी शिक्षणाधिकारी विद्या शिंदे, सभापती अलगोंडा-पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष माने यांचे भाषण झाले. तसेच, प्रा. एस. डी. मोकाशी यांना मान्यवरांच्या हस्ते गणित जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, प्रत्येक तालुक्यातील एक गणित शिक्षकास आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. राजशेखर चौधरी यांनी प्रास्तविकात अधिवेशनाचा उद्देश स्पष्ट केला. वशिष्ठ सोनकांबळे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील मुटाळे यांनी आभार मानले.

याप्रसंगी दक्षिण तालुका गणित अध्यापक मंडळाचे प्रसिद्धीप्रमुख सुरेश वाघमोडे यांनी संपादित केलेल्या ‘वास्तव’ या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.