आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 मटकाचालक पंधरा दिवसांसाठी हद्दपार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर शहरातील अवैध मटका व्यवसायाचे बुकीचालक म्हणून पाच जणांना पोलिसांनी अटक करून विविध न्यायालयात हजर केले होते. न्यायालयांनी पाचही जणांना 15 दिवसांसाठी सोलापूर शहर हद्दपारीचा आदेश बजावला आहे. अनेकांच्या कुटुंबांची वाताहत होत असताना शहरात मटका बंद होत नसल्याने ‘दिव्य मराठी’ने ‘मटकामुक्त सोलापूर’ वृत्तमालिका सुरू केली आहे. पोलिसांनी 5 जणांना अटक केली असली तरी इतरही काही मुख्य सूत्रधार मोकळेच आहेत.

गुन्हे शाखा विभागाच्या पथकाने जुबेर शब्बीर ढालायत (वय 35), समीर अ.करीम हुंडेकरी (वय 38, रा. रेल्वे लाइन), सचिन ज्ञानदेव बावळे (वय 35, रा. लोभा मास्तर चाळ), सुरेश लक्ष्मण ताकमोगे (वय 47, रा. विश्वकिरण पार्क, जुळे सोलापूर), सर्फराज ऊर्फ पापा महिबूब शेख (वय 30, रा. जोडबसवण्णा चौक) या आरोपींना मटका बुकीचालक म्हणून सोमवार-मंगळवार अशा दोन दिवसात अटक केली होती. त्यानंतर संबंधितांना जोडभावी पेठ पोलिस ठाणे, सदर बझार पोलिस ठाणे, फौजदार चावडी पोलिस ठाणे, विजापूर नाका पोलिस ठाणे, जेलरोड पोलिस ठाण्याकडे रवाना केले. संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी पाच मटका बुकीचालकांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयांनी वरील आदेश दिला.

पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांनी सोमवारी सायंकाळी मटक्याप्रकरणी पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांना चांगलेच सुनावले होते. पोलिस निरीक्षक बुकीचालकांवर कारवाई करीत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी पोलिस उपायुक्त व साहाय्यक पोलिस आयुक्तांची असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या मुलाखतीत रासकर यांनी सांगितले होते. दरम्यान, गुन्हे शाखेकडून आरोपींना पकडण्याची कारवाई झाली आहे.

विश्वास निर्माण करावा
बुकीचालकांवर सीआरपीसी 151 (3) नुसार कारवाई झाली. मात्र त्यांच्यावर कायद्याचा धाक असायला हवा, अशी कारवाई करणे अपेक्षित होते. कारण पुन्हा असे अवैध व्यवसाय ते करू नये. तसेच गुन्हे शाखेने पाच मटका बुकीचालकांना एका दिवसात अटक केली हे कौतुकास्पद आहे. परंतु अद्यापही मुख्य सूत्रधार मोकळेच आहेत. त्यासाठी त्यांनाही लवकरच अटक व्हावी.

मटका बुकीचालक म्हणून अटक केली जात असताना केवळ 151 (3) कलम कसे लावले हे पोलिसांनाच विचारावे लागेल. ज्या कारणांसाठी आरोपींना अटक करण्यात येते त्यानुसार त्यांच्यावर सर्व कलमे लावणे पोलिसांचीच जबाबदारी असते. अँड. असीम सरोदे (पुणे)

अवैध व्यवसाय करणार्‍यांवर समाज विघातक कृत्य केल्याचे कलम लावणे गरजेचे होते. भादंवि 420, तसेच 120 बी 2 हे कलम लावणे गरजेचे होते. जेणेकरून दोन दिवस तरी त्यांना पोलिस कोठडी मिळाली असती. कायद्याचा धाक आरोपींवर राहिला असता. अँड. राम कदम, सोलापूर.