आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाद टाळणा-या महापौरांचा शेवटचा दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- अडीचवर्षांपूर्वी काँग्रेसच्या नेत्या रजनी पाटील आणि उज्ज्वला शिंदे यांच्या प्रयत्नातून महापौरपदी अलका राठोड विराजमान झाल्या. मार्च २०१२ पासून आजवर अपवाद वगळता त्यांनी कधीही वाद ओढावून घेतल्याचे दिसले नाही. महापालिका सभागृह विरोधकांना विश्वासात घेऊन नेटाने चालवले. कोणत्याही नगरसेवकास डावलले नाही. अधिका-यांना मुद्दामहून त्रास दिला नाही. एका अर्थाने वाद टाळणाऱ्या महापौर राठोड यांच्या महापौरपदाचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. शनिवारी नवीन महापौर म्हणून सुशीला आबुटे यांची निवड जवळपास निश्चित मानले जात आहे.
महापौर अलका राठोड यांनी महिलांसाठी शौचालये उभारणी करण्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांच्या कामांना सुरुवात तर केली. त्यांनी अनेक महत्त्वाच्या कामांचा शुभारंभ केला. पण, त्यांच्या कारकिर्दीत ती कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. २१२ कोटी रुपयांची ड्रेनेज कामे आणि २३२ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामांचे मक्ते त्यांच्याच कारकीर्दीत रद्द करण्यात आले.
महापौरांची जमेची बाजू
महापौरराठोड यांना काम करताना पक्षांतर्गत अडचणी आल्या. पण त्यांनी उघडपणे त्यावर बोलणे टाळले. महिला शौचालयांसाठी एक कोटीची तरतूद केली. त्या कामासाठी काही ठिकाणी भूसंपादन झाले. शंकरराव चव्हाण यांचा पुतळा डफरीन चौकात तर वसंतराव नाईक यांचा पुतळा नेहरू नगर येथे महापौरांच्या कार्यकाळात अनावरण झाले. कर्मचारी आंदोलन करत असताना त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. महिला म्हणून त्यांनी स्वत: काम केले. घरातील पुरुष मंडळीचा हस्तक्षेप होऊ दिला नाही.
अडचणीच्या गोष्टी
अडीचवर्षांपासून सुरुवातीला एलबीटीच्या मुद्द्यावरून त्यांची कोंडी झाली. नगरोत्थान योजनेअंतर्गत ड्रेनेज आणि रस्त्याच्या कामास प्रारंभ तत्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते केला. त्या योजनेच्या कामांची मुदत संपली, पण कामे पूर्ण झाली नाहीत. नंतर या कामांचे मक्ते आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी रद्द केले. याशिवाय कचरा उचलण्याच्या कामास सुरुवात झाली, पण हे कामही वादात अडकले. शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत होता, तो आता तीन दिवसांआड होत आहे. मनपा पोटनिवडणूक लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला.