आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्पाबाबत महापौर व पक्षनेते यांच्याकडून हालचाली नाही

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा 31 मार्चऐवजी दोन दिवस आधी घेतली पाहिजे अशा प्रतिक्रिया सत्ताधारी नगरसेवकांनी दिल्या खर्‍या. पण महापौर आणि पक्षनेते यांच्याकडून तशा काहीच हालचाली होताना दिसत नाहीत. दरवर्षी 31 मार्च रोजी बजेट सभेत काही मोजकेच नगरसेवक बोलतात आणि मनसोक्त बोलण्याच्या नादात विषयांतर करतात. अनावश्यक चर्चेमुळे सभेचा बराचसा वेळ वाया जातो. मुख्य विषय बाजूलाच राहिल्याने तासन् तास चाललेली चर्चा निष्फळ ठरते. यामुळे बजेटची सभा दोन दिवस घेण्याची मागणी अनेक सत्ताधारी नगरसेवकांनी ‘दिव्य मराठी’कडे केली होती.

दरवर्षी ठरल्याप्रमाणे बजेटच्या प्रारंभी लक्षवेधी घेतली जाते आणि इंटरव्हलपर्यंत लक्षवेधीसाठी वेळ खर्ची पडतो. प्रत्यक्षात दहाची वेळ असताना दुपारी बारा वाजल्यानंतरच सभेस सुरुवात होते. यानंतर लक्षवेधीद्वारे प्रथम शहरातील समस्या मांडल्या जातात. जेवणानंतर बजेटवर चर्चा होते. यामध्ये काही अभ्यासू नगरसेवक आपले मत मांडतात. नवखे मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवतात. नवख्याना बोलण्याची संधीच दिली जात नाही आणि बघता बघता रात्री 12 ची वेळ येते आणि बजेट सभा गुंडाळली जाते. यामुळे सर्वांना बोलण्याची संधी मिळावी आणि नवनवीन विचारातून शहराचा विकास साधता यावा म्हणून बजेट सभा ही दोन दिवस होणे अत्यावश्यक असल्याचे मत अनेक नगरसेवकांनी व्यक्त केले. तसेच याबाबतीत महापौर अलका राठोड तसेच पक्षाचे शहराध्यक्ष धर्मा भोसले यांनीही संमती दिली. मात्र प्रत्यक्षात 31 मार्चपूर्वी सभा घेण्याच्या काहीच हालचाली महापौर अलका राठोड आणि पक्षनेते महेश कोठे यांच्याकडून होताना दिसत नाहीत.

दोन दिवस सभा होण्यासाठी सत्ताधारी पक्षातील 75 टक्के नगरसेवकांची संमती असताना एकाधिकार कोणाचा चालत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन दिवस चर्चा न होऊ देण्यामागे स्थानिक नेत्यांचे काय स्वार्थ आहे, याचे उत्तर गुलदस्त्यात आहे.


बजेट सभेत सर्व सदस्यांचे विचार ऐकले तर त्यातून नवे विचार मिळतील. पूर्वी उत्पन्न आणि खर्चही कमी होता म्हणून एक दिवस पुरेसे होते. मात्र सध्या महापालिकेचे उत्पन्न वाढले आहे आणि शहराचे क्षेत्रही वाढले आहे. त्यामुळे शहर विकासाच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी निदान दोन दिवस चर्चा व्हावी. तशी आम्ही लेखी विनंती महापौर अलका राठोड यांच्याकडे केली आहे.’’ रोहिणी तडवळकर, विरोधी पक्षनेत्या