आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mayor Chandrakant Gundewar Issue At Solapur, Divya Marathi

सोलापूरमध्‍ये \'अब की बार गुडेवार\', आयुक्‍त सोलापुरात परतणार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्यावर काँग्रेस नगरसेवक दबावतंत्राचा वापर करत असल्याच्या निषेधार्थ सर्वविरोधी पक्षांनी पुकारलेल्या ‘सोलापूर बंद’ला बुधवारी चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारी 12 वाजता विरोधी पक्षांनी काढलेला मोर्चा निघाला अन् 2 वाजता गुडेवार गुरुवारी सोलापुरात परतणार, अशी वार्ता धडकली. त्यामुळे राजवाडे चौकात भाजप- सेनेने पेढे तर बसपने महापालिकेत लाडू वाटून फटाक्यांची आतषबाजी केली व आनंद व्यक्त केला.

सकाळी पांजरपोळ चौकातून आमदार विजयकुमार देशमुख, शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे, शिवसेना शहर प्रमुख प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेवक अशोक निंबर्गी, कामगार नेते अशोक जानराव, शाहू शिंदे, सुनील शेळके, विजय पुकाळे, संजय कणके, गटनेते भीमाशंकर म्हेत्रे, नगरसेवक संजय कोळी आदींनी मिळून पांजरपोळ चौक, मेकॅनिकी चौक, नवी पेठ, सरस्वती चौक आदी भागांत बंदचे आवाहन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला.
पूर्व भागातून शिवसेना कामगार नेते विष्णु कारमपुरी, शिवसेना महिला आघाडी प्रमुख अस्मिता गायकवाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह तेथे पोहोचले. तसेच मनसेचे शहराध्यक्ष युवराज चुंबळकर आणि प्रशांत इंगळे यांनीही आपली उपस्थिती लावली. माजी आमदार नरसय्या आडम आले आणि काही मिनिटातच सभेची तयारी झाली. विरोधी पक्षांच्या पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी देशमुख यांची भेट घेऊन गुडेवार यांना परत कामावर रुजू होण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा सुरू झाली. यावेळी माकपचे युसूफ मेजर, सिध्दप्पा कलशेट्टी, नसिमा शेख, नलिनी कलबुर्गी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
स्‍वाक्षरी मोहिम
‘अब की बार गुडेवार, सोलापूरचे शिल्पकार गुडेवार, भारतात मोदी, सोलापुरात गुडेवार, सोलापूर को आपकी जरुरत हैं,’ अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत सोलापूरकरांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला. स्वाक्षरी करून पाठिंबा देण्यासाठी बुधवारी संध्याकाळी चार पुतळ्यासमोर तरुणाईची झुंबड उडाली होती. महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या सर्मथनार्थ समाजातील काही प्रतिष्ठित लोकांनी मिळून चार पुतळ्यासमोर बुधवारी सायंकाळी स्वाक्षरी मोहीम घेतली. सतीश मालू, खुशाल देढिया, संदीप जव्हेरी, सूर्यकांत भोसले, वैभव होमकर, जितेंद्र राठी, चंद्रिका चौहान, शुभांगी बुवा, प्रतीक जोशी, धनंजय रायचूर आदींचा यासाठी पुढाकार दिसून आला. दोन ते अडीच तासांत तरुण, वृद्ध, पुरुष, महिला, मुले अशा सर्व स्तरांतील लोकांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदवला.

‘आप’ची निदर्शने
गुडेवार यांनी पदभार सोडल्याने ते परत यावे म्हणून आम आदमी पक्षाच्या वतीने महापालिके समोर निदर्शन करून काँग्रेस नगरसेवकांचा निषेध केला. या वेळी केदारी सुरवसे, ठाणेकर, मकरंद चनमल, सागर पाटील उपस्थित होते.
गुडेवार यांच्याबद्दल समाजमनात आदर आहे. लोकांना गुडेवार सर्मथनार्थ कौल मांडता, यावा यासाठी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन केले होते. मोहिमेस उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे समाधान आहे. सतीश मालू, संयोजक
प्रामाणिक, स्वच्छ प्रतिमा व पारदर्शी कारभार करणार्‍या अधिकार्‍यास आमचा नेहमीच पाठिंबा राहणार आहे. आम्हाला सोलापूर पर्यावरणपूरक सुंदर करायचे आहे. डॉ. अपर्णा जगताप
मी दृष्टिहीन असलो तरी गुडेवार यांच्या पारदर्शी कामाने प्रभावीत आहे. सोलापूरसाठी प्रामाणिकपणे काम करणार्‍या अधिकार्‍यांची गरज आहे. त्यांना पाठिंबा देणे आपले कर्तव्यच. राजकुमार सावळगी, बॅँक कर्मचारी
नवी पेठ सायंकाळी सुरू
नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी व्यापार्‍यांना बंदचे आवाहन केले. सकाळपासूनच नवी पेठ, शिवाजी चौक, मेकॅनिकी चौक, बाळीवेस आदी भागांतील व्यवहार ठप्प झाले होते. दुपारी बंद मागे घेण्यात आला.
खेळाडूंची रस्त्यावर निदर्शने
जॉगर्स क्लबच्या सदस्यांनी विजापूर रस्त्यावर बुधवारी सकाळी निदर्शने केली. सुरुवातीला खेळाडू व जॉगर्सच्या सदस्यांनी मैदानावरून विजापूर रस्त्यापर्यंत फेरी काढली. त्यानंतर रस्त्यावर निदर्शने केली.