आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MBA Exam Issue At Solapur University, Divya Marathi

एमबीएच्या परीक्षेबाबत अखेर विद्यापीठाचे घूमजाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाने एमबीए परीक्षेचे अंतिम वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केले आहे. यानुसार एमबीए प्रथम व तृतीय सत्र परीक्षा 27 मेपासून, तर द्वितीय व चौथी सत्र परीक्षा 12 जूनपासून सुरू होत आहे.

सोलापूर विद्यापीठ एमबीएच्या या परीक्षा 7 मे व 9 मे पासून घेणार होते. त्यापूर्वी 2 जून अशी तारीख विद्यापीठाने घोषित केली होती. अचानक परीक्षा तोंडावर आल्याने एमबीए विद्यार्थी आंदोलनाच्या पातळीवर उतरले. अभ्यासाला पुरेसा वेळ मिळत नसल्याने थेट करिअरवर विपरित परिणाम होईल असा त्यांचा आक्षेप होता. मात्र, परीक्षा विभागाने ताठर भूमिका कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यातून प्रश्न चिघळला. त्यात परीक्षा विभागातील सहाय्यक कुलसचिव अनिल जाधव यांनी आक्षेपार्ह भाषेत विद्यार्थ्यांना सुनावले. विद्यार्थी संघटनाही सक्रिय झाल्या. दबावामुळे विद्यापीठाला लवकर परीक्षा घेण्याचा आपला निर्णय मागे घ्यावा लागला.

परीक्षा लवकर घेतल्यास विद्यार्थ्यांना पदवी लवकर मिळेल, नोकरीच्या संधी लवकर मिळतील, असा शोध सिंहगडच्या एमबीए विभाग प्रमुखांना लागला. त्यांनी लगोलग तसे पत्रही दिले. परीक्षा विभागाने निर्णयही घेतला. या घटना इतक्या वेगाने झाल्या की विद्यार्थ्यांना अंदाजच आला नाही. खरेतर परीक्षा घेण्यापूर्वी 21 दिवस आधी कच्चे वेळापत्रक जाहीर होते. नंतर ते अंतिम केले जाते. मात्र, एमबीए परीक्षेबाबत असे काहीच झाले नाही.
परीक्षेची तयारी करण्याला वेळच नाही मिळाला तर आम्ही सरळ नापासच होऊ शकतो नं, मग करिअर कसे लवकर सुरू होईल, असा रोकडा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. त्याला कोणाकडेच उत्तर नव्हते. एमबीए विद्यार्थ्यांनी मात्र एकी दाखवली. आमदार प्रणिती शिंदे यांनी पत्र दिले. कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांना या प्रश्नी लक्ष घालावे लागले व प्रश्न सुटला.
एमबीए परीक्षांच्या तारखा विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार अंतिम करण्यात आल्या आहेत. विद्यापीठ संकेतस्थळावर हे वेळापत्रक विद्यार्थ्यांना पाहता येईल. डॉ. एस. व्ही. लोणीकर, प्रभारी परीक्षा नियंत्रक