आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Medicle Training For St Driver And Cunductordoctor To

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसटी घालणार जखमेवर फुंकर ; डॉक्टरांमार्फत मिळणार रोज अर्धा तास प्रशिक्षण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - एकाही प्रश्नाला सरळ उत्तर न देणारे, प्रवाशांच्या अंगावर वसकन येणारे, एसटी ही जणू आपली खासगी मालमत्ताच आहे, अशा तो-यात वावरणारे अशी प्रतिमा एसटीच्या चालक-वाहकांची आहे. परंतु लवकरच ही प्रतिमा बदलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
एसटीचे वाहक आणि चालक जखमी प्रवाशांवर प्रथमोपचार करताना दिसतील. एसटी प्रवासादरम्यान दुर्दैवाने अपघात घडलाच तर अशावेळी हा प्रथोमचार संजीवनी ठरणार आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामुळे सुरक्षित प्रवासासाठी ओळखला जाणारा एसटीचा प्रवास आणखी सुरक्षित होणार आहे.
अपघातानंतर वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे प्रवासी मृत्युमुखी पडण्याचे प्रकार घडतात. चुकीच्या उपचारामुळे 25 टक्के लोकांना प्राणास मुकावे लागते. कधी रुग्णालय जवळ नसते, कधी मदतीला धावून यायला कोणीच असत नाही, ही कारणेही जखमी प्रवाशांना मृत्यूच्या खाईत लोटतात. अपघातानंरचा पहिला एक तास जखमींसाठी लाखमोलाचा असतो. याला वैद्यकीय भाषेत गोल्डन पीरियड म्हणतात. या वेळेत जखमीला योग्य वैद्यकीय मदत मिळाली तर त्याचे प्राण वाचू शकतात. म्हणूनच सोलापूरचे आरटीओ सर्व चालक-वाहकांना प्रथमोपचाराचे धडे देणार आहे. यासाठी रोटरीच्या डॉक्टरांची मदत घेण्यात येणार आहे.
आगारातच मिळेल प्रशिक्षण - 30 ते 40 चालक-वाहकांचे गट पाडण्यात येतील. आगारातल्या आगारातच त्यांना दररोज किमान अर्धा तास प्रशिक्षण देण्यात येईल. इतकेच नाही तर एड्सच्या संसर्गाबद्दलही चालक-वाहकांना माहिती देण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यात जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील अधिका-यांच्या वाहनचालकांनाही हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जनतेच्या सेवेतल्या अधिका-याचे प्राणही तितकेट बहुमूल्य असते. त्यामुळे हे प्रशिक्षण कार्यक्रम सरसकटराबवण्यात येईल. याआधी हा प्रयोग रत्नागिरीत राबवण्यात आला होता. रिक्षाचालक, ट्रक चालक, क्लीनर, टेम्पोचालकांनाही हे प्रथमोपचार प्रशिक्षण देण्यात आले होते.
चालक-वाहकांना देण्यात येणा-या या प्रशिक्षणातून एका प्रवाशाचे प्राण वाचले तरी आमच्या कामाचे सार्थक होईल. असा प्रयोग करणारे सोलापूर हे राज्यातील दुसरे शहर आहे.’’ अनिलकुमार वळीव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
प्रथमोपचारात मिळतील हे धडे - प्रवासादरम्यान अनेकांना किरकोळ इजा होतात. काहींचा श्वासही बंद पडतो. कधीकधी हाता-पायांना गंभीर जखमा होतात. डोक्याला जबर मार लागतो. समजा पायाला मार लागला आणि अति रक्तस्राव होत असेल तर गुडघ्याला गच्च् बांधावे लागते. 10 ते 15 मिनिटांनंतर हे बांधलेले सैल करणे आवश्यक असते. हे जर असेच बांधून ठेवले तर रक्त गोठण्याचा मोठा धोका असतो. त्यामुुळे प्रसंगी प्राणासही मुकावे लागते. हे सर्व धडे या प्रथमोपचारात देण्यात येणार आहेत. यासारखेच इतरही अनेक बाबींचे प्रशिक्षण डॉक्टरांमार्फत चालक-वाहकांना देण्यात येणार आहे.