आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायक्रो फायनान्स : गुंतवणूकदार हवालदिल, सुमारे दोन कोटी अडकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो : शुक्रवारी सकाळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी साखर पेठेतील मायक्रो फायनान्सच्या कार्यालयात येऊन तेथील कागदपत्रे ताब्यात घेतली.)

सोलापूर - "साहेब, मुलीच्या लग्नासाठी पैसे जमा केले हो, पैसे नाय मिळाल्यास आत्महत्या करावं लागेल, तुम्ही कायपन करा, पैसे मिळवून द्या...' अशा शब्दांत गऱ्हाणे मांडून पोलिसांकडेच पैसे परतीची मागणी करत होते. हृदय हेलावणारे हे चित्र पाहून पोलिसांचे डोळेही पाणावले. पैसे सुरक्षित आहेत का? ते कधी मिळतील याची चिंता गुंतवणूकदारांना लागून राहिली आहे. प्रत्येकजण त्यासंदर्भात चौकशी करतो आहे.

शुक्रवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन आरोपींना साखर पेठ येथील मायक्रो फायनान्सच्या शाखेत आणून तेथील सर्व साहित्य जप्त केले. ऑफिस उघडताच पैसे मिळतील या अपेक्षेने सभासदांनी गर्दी केली होती. यावेळी पोलिसांनी पास बुक, रजिस्टर, पावत्या आदी साहित्य जप्त केले आणि त्या आरोपींना घेऊन गेले.

मुंबईच्या अ‍ॅक्सिस बँकेला पोलिसांचे पत्र
ओडिशा राज्यातील मायक्रो फायनान्सवर नोव्हेंबर २०१४ मध्ये रिझर्व्ह बॅँकेने बंदी आणली. तरीही गेल्या पाच महिन्यांपासून सोलापुरातील शाखेने सभासदांकडून पिग्मी वसूल केली. सोलापूरच्या मायक्रो फायनान्सचा आर्थिक व्यवहार मुंबईच्या अ‍ॅक्सिस बॅँकेबरोबर होता. जमा केलेले पैसे बॅँकेत जमा आहेत की नाही, जमा आहेत तर किती आहेत, ते सभासदांना मिळणार का याबाबत पोलिस चौकशी करणार आहेत. त्यासाठी पोलिसांनी बँकेला पत्र पाठवले आहे. गुंतवणूकदारांचे सुमारे दोन कोटी रुपये मायक्रो फायनान्सकडे जमा असतील असा पोलिसांचा अंदाज आहे.

सीआरबी कॅपिटल, संचयनी, सहारा इन्व्हेस्टमेंट, पर्ल्स ग्रीन फॉरेस्ट या प्रमुख कंपन्यांनी सोलापूरकरांची आर्थिक फसवणूक केली. या ‘नॉनबँकिंग इन्व्हेस्टमेंट कंपन्या’ असल्याने कुठल्याही विम्याचे संरक्षण नाही. त्यामुळे रकमा परत मिळण्याची शक्यताच नाही. याबाबत दाद मागायची तर संबंधित कंपन्यांचे न्यायालयीन कार्यक्षेत्र ठरलेले आहेत.
कोलकता, लखनऊ आणि दिल्ली येथे कंपन्यांची नोंदणी होते. तेथील न्यायालयेच त्यांच्या कक्षेत येत असतात. या सर्व बाबींचा तपशील पाहता, कागदपत्रांवर प्रतिनिधी सांगतील तिथे सह्या करतात. नंतर त्याची फसगत होते.

२००३ मध्ये शाखेचा शुभारंभ
6 कर्मचारी कार्यालयात
२० एजन्ट पिग्मी वसुलीस
३५०० सभासद १२ वर्षांत
१२ कोटी रुपये सुमारे जमा
९.५ % व्याज सभासदांना
१८ % व्याज कर्जासाठी होते

असा प्रकार उघड
कोनापुरेचाळ येथील पिग्मी एजन्ट हा गेल्या दहा ते बारा दिवसांपासून आला नव्हता. नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी लगेच पोलिस ठाणे गाठले आणि गुन्हा दाखल केला. यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

४०० रुपयांपर्यंतची पिग्मी
३५००सभासदांकडून दररोज २० रुपयांपासून ४०० रुपयांची पिग्मी वसूल केली जात होती. तीन वर्ष भरल्यानंतर साडे नऊ टक्के व्याजासह त्यांची रक्कम परत देणे असा नियम होता. कोणाकडून किती रक्कम परत मिळायची आहे हे पोलिस तपासांत निष्पन्न होणार आहे.

- ओडिशात नोव्हेंबर २०१४ मध्ये मायक्रो फायनान्सवर बंदी आली. तरीही सोलापुरात पिग्मी वसुली सुरूच होती. सभासद किती, वसुली किती, वसुली का केली आदी प्रश्नांची उत्तरे तपासातच मिळतील. राजेंद्रचव्हाण, पोलिस निरीक्षक

- मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी मी पिग्मी भरत होतो. सध्या माझे ५८ हजार रुपये जमा आहेत. पोलिसांनी आमचे पैसे मिळवून द्यावे. पैस मिळाल्यास आमच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळेल. अंबादासरोड्डा, सभासद

- नातीच्या लग्नासाठी मी पिग्मी भरली. आता पैसे घ्यायची वेळ आली तर असा प्रकार समोर आला. सध्या माझे ४५ हजार रुपये जमा आहेत. जिल्हाधिकारी पोलिसांनी आमचे पैसे मिळवून द्यावेत. सलिमाशेख, सभासद