आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यमंत्र्यांनी म्हणणे ऐकले, पण निर्णय नाही, गाळे लिलाव प्रक्रिया पुढे ढकलली जाण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिकागाळे लिलाव प्रकरणी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबईत बैठक झाली. मनपा प्रशासन आणि व्यापाऱ्यांची राज्यमंत्र्यांनी भूमिका ऐकून घेतली. परंतु, कोणताच निर्णय घेतला नाही. महापालिका राबवत असलेल्या गाळे लिलाव प्रक्रियेला प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे कदाचित ही प्रक्रिया पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गुडेवारांची बदली केली असली तरी गाळे लिलाव प्रक्रिया रोखणे शासनासमोरही आव्हान होऊन बसले आहे. नगरविकास राज्यमंत्री डॉ. पाटील यांच्या कक्षात झालेल्या बैठकीला पालकमंत्री विजयकुमार देशमुख, मनपाचे अप्पर आयुक्त विलास ढगे, भूमी मालमत्ता अधीक्षक सारिका आकुलवार, नगरसेवक नागेश वल्याळ, माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, दीपक मुनोत, नगरविकास विभागाचे रेडेकर उपस्थित होते.

लिलाव प्रक्रिया बेकायदा आहे. किमान भाडे ठरवण्याचा अधिकार नगर रचना बांधकाम विभागाला आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रिया थांबवावी, अशी भूमिका व्यापारी वर्गाच्या वतीने नगरसेवक नागेश वल्याळ यांनी मांडली. अप्पर आयुक्त ढगे यांनी गाळे लिलाव प्रक्रिया आर्थिक हित लक्षात घेऊन सुरू केली असल्याचे मत मनपा प्रशासनाच्या वतीने मांडले. अंतिम निर्णयाबद्दल पालिकेलाच विचारा असे सूचक वक्तव्य वल्याळ यांनी नेले. तर अंतिम निर्णय दिले नसल्याचे पालिकेतील सूत्राकडून सांगण्यात आले.

अंतिम निर्णय बुधवारी अथवा गुरुवारी होणार-
६०१गाळ्यांसाठी २०६ अर्ज आले आहेत. एका गाळ्यास किमान तीन याप्रमाणे १८०० अर्ज येणे अपेक्षित होते. शासनाकडे तक्रारी होऊ लागल्यानेच लिलाव प्रक्रियेला अल्प प्रतिसाद मिळाला. पुन्हा मुदतवाढ देण्याचा विचार सुरू असल्याचे मनपा सूत्राकडून सांगण्यात आले. अंतिम निर्णय बुधवार किंवा गुरुवारी होऊ शकतो.