आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार मानेंचा जाळला पुतळा, धुमसतेय काँग्रेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्याचा प्रयत्न करत काँग्रेस नेत्यांनी सोलापुरातील काँग्रेस धुमसत ठेवली आहे. शुक्रवारी दोन गटात हाणामारी झाली तर शनिवारी सातरस्ता व नई जिंदगी परिसरात आमदार दिलीप माने यांचाच पुतळा जाळला गेला. दुसरीकडे काँग्रेस निष्ठावंतांची शनिवारी दुपारी होणारी बैठकही ऐनवेळी रद्द करावी लागली. सहा जणांवर पोलिसांत गुन्हेही नोंदले गेले.
शहर काँग्रेसमधील कार्यकर्त्यांच्या हाणामारीकडे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी डोळेझाक केली. एकानेही पुढाकार घेऊन पक्षांतर्गत उफाळलेला वाद थांबवण्याची तसदी घेतली नाही. सारस्वत ब्राrाण मंगल कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी काँग्रेसचे शहराध्यक्ष धर्मा भोसले यांच्या विरोधातील गटाने बैठक आयोजिली. त्यामध्ये शिंदेंच्या पराभवाच्या कारणांचा शोध घेऊन पदांचे राजीनामे देण्याचे नियोजन होते. बैठकीला सुरुवात होताच भोसले सर्मथकांनी बैठक उधळून लावण्याचा प्रयत्न केला. त्यातील काहींनी परिवहन समितीचे माजी सभापती केशव इंगळे, राजन कामत, अविनाश जाधव यांच्यावर आरोप केले. तेथे वादावादी झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यावेळी बंदोबस्तासाठी उपस्थित पोलिसांनाही धक्काबुक्की झाली. त्यानंतर कार्याध्यक्ष दासरी यांनी शनिवारी दुपारी चार वाजता काँग्रेस भवनमध्ये बैठक घेऊन मारहाणीचा निषेध करण्यात येईल, असे सांगितले होते. पण, चार वाजता बैठकीसाठी माध्यमांचे प्रतिनिधी काँग्रेसभवनमध्ये पोचले. पण, त्यापूर्वीच दासरींनी बैठक रद्द झाल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले.
सुशीलकुमार शिंदे सोमवारी सोलापुरात येण्याची शक्यता

शनिवार आणि रविवारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापुरात येतील असे सांगण्यात आले होते, पण ते सोमवारी सोलापुरात येतील असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. शिंदे यांच्या उपस्थितीत या सर्वच विषयांवर चर्चा होईल असेही सांगितले जात आहे. त्यामुळे शिंदे यांच्या दौर्‍याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्सुकता आहे.