सांगोला- टेंभू,म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे कोणीही श्रेय घेऊ द्या. हे पाणी शेतकरी कामगार पक्षाच्या बहाद्दर कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे मिळाले आहे. त्यामुळे ते शेकापचे यश आहे, असा टोला शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांनी विरोधकांना हाणला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी येथे आयोजित शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
शेवटचा श्वास असेपर्यंत तालुक्यातील जनतेची सेवा करणार आहे.
आपण गेल्या ५० वर्षांत मला दहावेळा निवडून दिले. त्यामुळे दोनवेळा मंत्रिपदी संधी मिळाली. आता आगामी विधानसभा निवडणुकीतही निवडून द्या, अशी भावनिक साद आमदार देशमुख यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना घातली. ते म्हणाले, आमदार या नात्याने तालुक्यात विविध योजना राबविल्या. आमचा पक्ष कष्टकरी, शेतमजूर शेतक-यांचा आहे. भविष्यात कार्यकर्त्यांनी ५० जणांची बुथनिहाय यंत्रणा उभी करावयाची आहे. ती सक्षमपणे राबवायची आहे.
अध्यक्षस्थानी शेकापचे राज्य सरचिटणीस आमदार जयंत पाटील होते. ते म्हणाले, तालुक्यातील विविध संस्थांच्या पदािधकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार देशमुख यांनाच उमेदवारी देण्यास सांगितले. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत कोणाची कोणाशीही युती होवो, मात्र सांगोला मतदारसंघात आमदार गणपतराव देशमुख हेच उमेदवार असतील. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर उमेदवारीची घोषणा करत आहे. याप्रसंगी भाई एस.एम.पाटील, एस.व्ही. पाटील, लक्ष्मण कोळेगावकर, नानासाहेब लिगाडे, नगराध्यक्ष नवनाथ पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यात आमदार गणपतराव देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित पक्षाचे कार्यकर्ते नागरिक.