आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार प्रणिती शिंदे यांना ढेकूण चावल्‍यामुळे चक्क बदलला रेल्वेचा डब्बा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांना सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या प्रथम श्रेणीच्या वातानुकूलित डब्यात ढेकूण चावला. आमदार प्रणिती शिंदे यांनी याची तक्रार करताच रेल्वे प्रशासनाने याचा धसका घेतला आणि या प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून तो पूर्ण डबाच बदलला. बुधवारी सायंकाळी नवीन डबा मुंबईहून सोलापुरात दाखल झाला आहे. ढेकण चावल्यानंतर रेल्वेचा पूर्ण डबाच बदलण्याची ही विभागातील पहिलीच घटना आहे.
आमदार प्रणिती शिंदे या दोन दिवसांपूर्वी कामासाठी सिद्धेश्वर एक्स्प्रेसने मुंबईला जात होत्या. एक्स्प्रेसच्या प्रथम श्रेणीच्या डब्यातून त्यांचा प्रवास सुरू होता. गाडी कुर्डुवाडीला येताच शिंदे यांना ढेकूण चावला. गाडी पुढे निघाल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी चेन ओढून गाडी थांबवली. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू झाली. शिंदे यांनी सोलापूरचे डीआरएम जॉन थॉमस यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले. मध्य रेल्वेकडे पाठपुरावा करून कोचच बदलून आणला. दरम्यान, सामान्य प्रवाशाला असा त्रास झाला तर रेल्वे प्रशासन एवढीच तत्परता दाखवेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खबरदारी म्हणून डबाच बदलला
आमदार शिंदे यांना ढेकूण चावल्यानंतर कोचची पूर्ण तपासणी करण्यात आली. तिथे ढेकूण आढळले नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून तो पूर्ण डबाच बदलला आहे. मुंबईहून सोलापूरला डबा आला आहे. शिवाजी कदम, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता, रेल्वे प्रशासन