आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोठेंबद्दल प्रणिती शिंदे म्हणाल्या, ‘मत मांडण्याचा त्यांना अधिकार’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सभागृहनेते महेश कोठे यांनी व्यक्त केलेल्या उद्विग्नतेबद्दल ‘दिव्य मराठी’ने गुरुवारी शहरातील प्रमुख काग्रेस नेत्यांची मते जाणून घेतली. आमदार दिलीप माने, शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी कोठे यांनी काग्रेस सोडून जाऊ नये असा सूर आळवला तर आमदार प्रणिती शिंदे यांनी मात्र ‘लोकशाहीत आपापले मत नोंदवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे,’ अशी बोलकी प्रतिक्रिया दिली. यातून काँग्रेसमध्ये काही तरी शिजत असल्याचेच उघड दिसते आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे यांनी कोठे यांच्यावर शरसंधान केले आहे.
‘गेल्या 20 वर्षांपासून महापालिका तुमच्या नेतृत्वाखाली चालते. सुशीलकुमार शिंदेंमुळेच ही ताकद मिळाली. असे असताना तुम्ही कशाला गुदमरताय? उलट आम्ही सिनिअर मंडळी गुदमरले पाहिजे,’ असा टोला सपाटे यांनी कोठे यांना लगावला. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पराभवाचे खापर स्वकीयांवर फोडले. यावर प्रथमच कोठे यांनी बुधवारी पत्रकारांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना 40 वर्षे एकनिष्ठ राहूनही वाट्याला बदनामी आल्याची उद्विग्नता मांडली. त्यावर त्यांचे कट्टर राजकीय विरोधक सपाटे यांनी गुरुवारी पत्रकारांसमोर काही मुद्दे मांडले. कोठेंची अन्यायाची भावना म्हणजे ‘सुशील विचार’ सोडल्याचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले.
उत्तरला माझी गरज
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून महेश कोठे यांनी निवडणूक लढवली तर पुन्हा बंडखोरी करणार काय? या प्रश्नावर सपाटे म्हणाले, ‘यंदाच्या लग्नातला नवरदेव मीच आहे. शहर उत्तरला माझ्यासारख्या नेत्याचीच गरज आहे. त्यामुळे मी बंडखोरी करावी, असे माझ्या पक्षाला वाटणार नाही.’
त्यांनी त्यांचे मत मांडले आहे..
विष्णुपंत कोठे हे शिंदेसाहेबांच्या खूप जवळचे आहेत. मात्र लोकशाहीत आपापले मत नोंदवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यांनी त्यांचे मत मांडले आहे. प्रणिती शिंदे, आमदार, शहर मध्य
..तर पक्षाचे नुकसान
आमदारकी विष्णुपंत कोठे यांना मिळेल असे वाटत होते. शिंदे साहेबांनीही प्रयत्न केले. पक्षाने वेगवेगळे निकष लावल्याने संधी मिळाली नसेल. त्यांनी पक्ष सोडल्यास पक्षाचे नुकसान होईल, त्यामुळे त्यांनी पक्ष सोडू नये. दिलीप माने, आमदार, सोलापूर दक्षिण
महेश कोठे काँग्रेस सोडणार नाहीत
आजवर कोठे यांनी पक्षासाठी काम केले. आताही ते पक्ष सोडून जाणार नाहीत, असा मला विश्वास आहे. शुक्रवारी शिंदे साहेब येणार आहेत, त्यांच्याबरोबरही चर्चा होईल. प्रकाश यलगुलवार, शहराध्यक्ष