आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसप, मनसे कार्यकर्त्यांची स्टंटबाजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - हुतात्मा स्मृती मंदिरमधील काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि बहुजन समाज पक्षाने आंदोलनाची परिसीमा गाठली. कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची तोडफोड तर केली. नंतर त्या खुर्च्या महापौरांच्या दालनात नेऊन खुर्च्या जाळून टाकण्याची भाषा केली. दरम्यान, प्रशासनाने पोलिसांत फिर्याद नोंदवली. त्यानुसार 35 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

हुतात्मा स्मृती मंदिरमधील काम निकृष्ट झाल्याचे भाजप, शिवसेनेने पाहणी करून आंदोलनाचा इशारा दिला, त्यानंतर मनसेने उद्घाटनच होऊ देणार नाही असे जाहीर केले. ते कमी म्हणून की काय, गुरुवारी सायंकाळी अचानक आंदोलन करण्यात झाले. असेच काम होत असेल तर सर्व खुर्च्या बाहेर काढून जाळून टाकण्याची भाषाही करण्यात आली. त्यानंतर मनसेचे युवराज चुंबळकरांसह काहीजण तेथे होते. त्यांनीही तेथील सुमारे दहा खुर्च्या थेट महापौर कक्षासमोर नेऊन आदळआपट करून त्यांचे नुकसान केले. चंदनशिवे यांच्यासह सात जणांनी पालिकेतील सत्ताधारी आणि खुर्च्याचे काम करणारे मक्तेदार यांच्या विरोधात घोषणा देत सहा खुर्च्या बाहेर आणून टाकल्या व त्यांची आदळआपट केली. हा प्रकार उपअभियंता शांताराम आवताडे, व्यवस्थापक प्रदीप जोशी यांच्या समोरच घडत होता. एक हजार कार्यकर्ते आणून सर्व खुर्च्या बाहेर काढून जाळण्यात येईल, असे चंदनशिवे यांनी बजावले.

‘मनसे’ही झाली आक्रमक
मनसेचे युवराज चुंबळकर, प्रशांत इंगळे, नमिता थिटे, रोहित बंदपट्टेसह सुमारे 30 कार्यकर्ते स्मृती मंदिर परिसरात होते. ते सर्वजण स्मृती मंदिरमधील खुर्च्या काढून घेऊन महापौर कक्षापर्यंत घोषणाबाजी करत गेले. तेथे त्या खुर्च्यांची तोडफोड केली. महापौर कक्षात जाऊन महापौर कुठे आहेत असे विचारत तेथे घोषणाबाजी केली. त्यानंतर सभागृहासमोर आंदोलन करत घोषणाबाजी केली.

35 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
हुतात्मा स्मृती मंदिरातील खुर्च्याची तोडफोड केली तसेच जाळून टाकण्याची भाषा केली, त्याची गंभीर दखल घेत प्रशासनाने पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यानुसार बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे, श्रीमंत जाधव, मनसेचे शहराध्यक्ष युवराज चुंबळकर यांच्यासह 30 ते 35 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मनपाचे सेवक प्रदीप जोशी यांनी सदर बझार पोलिसात फिर्याद नोंद केली.

भाजपचे पाण्यासाठी आंदोलन
तीन दिवसांआड पाणीपुरवठा करून रोजची पाणीपट्टी आकारली जाते. ती 50 टक्के करावी असा ठराव सभागृहात झाला असता, त्यांची अमलबजावणी करा आणि यूज नाही तर यूजर चार्ज कशाला? असे म्हणत भाजपच्या सात नगरसेवकांनी काही कार्यकर्त्यांसह महापालिका आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले. सहाय्यक आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना निवेदन देत अर्धा तास चर्चा केली. सदरचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याचे डॉ. जावळे यांनी सांगितले. यावेळी मनपा प्रभारी विरोधी पक्षनेता पांडुरंग दिड्डी, नगरसेवक सुरेश पाटील, जगदीश पाटील, मोहिनी पतकी, रोहिणी तडवळकर, नरसूबाई गदवालकर, सुरेखा अंजिखाने, नागेश वल्याळसह वीरभद्रेश्वर बसवंती, शशी थोरात, बाबूराव जमादार, कुमार कांती, पांडुरंग कुलकर्णी आदी उपस्थित होते.