आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर महापालिकेत ‘अतिरेकी अन् थरार’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मंगळवार रात्री आठची वेळ. काही जण महापालिकेच्या हिरवळीवर गप्पात रंगलेले तर काही कर्मचारी, नागरिक घर गाठण्याच्या बेतात. अचानक पोलिसांचा फौजफाटा दाखल होतो. गजबजलेला महापालिकेचा परिसर दोन मिनिटांतच रिकामा होतो. हा थरार होता, पण एनएसजी कमांडोच्या मॉकड्रिलचा. सोलापूरचे प्रशासन किती सतर्क आहे, हे तपासून घेण्यासाठी हा मॉकड्रिल घेण्यात आला.

रात्री आठच्या सुमारास महापालिकेत काही अतिरेकी घुसल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी लागलीच महापालिकेचा ताबा घेतला. सर्वसामान्य नागरिक त्या स्थानापासून दूर राहावा म्हणून पोलिसांनी डफरीन चौक येथून महापालिकेकडे येणार्‍या मार्गावर बॅरीकेडिंग लावून तो बंद केला. महापालिकेला पोलिसांनी चारही बाजूंनी घेरले आणि बंदोबस्त लावला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, शासकीय रुग्णालयाची रुग्णवाहिका, बॉम्बशोधक पथक, महापालिकेत दाखल झाले. बघता बघता महापालिकेत काही तरी गडबड झाली आहे, अशी वार्ता वार्‍यासारखी पसरली आणि बघ्यांची गर्दी जमली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून कोणालाच आत प्रवेश दिला नाही. दरम्यान, महापालिकेत घुसलेल्या अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी कमांडोंनी महापालिकेचा परिसर पिंजून काढला. अतिरेक्यांना ठार करण्यासाठी कमांडोंनी तीन राऊंड फायरही केले. रात्री साडे अकराच्या सुमारास हे मिशन पूर्ण झाले. हा मॉकड्रिल होता, असे समजल्यानंतर शहरवासीयांचा जीव भांड्यात पडला.