आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा खोटेपणा उघड झाला, ‘बीएसपी’ आम्हीच सुरू केले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेले भाषण गोलमाल करणारे आहे. वीज, रस्ते व पाणी (बीएसपी) ही संकल्पना मी 2009 मध्येच सोलापुरात सुरू केली आहे. निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना ते सोलापुरातील कपड्यांचे गणवेश व धनगर समाजास आरक्षण याचा उल्लेख केला होता. परवा ते यावर काहीच बोलले नाहीत. त्यावरून त्यांचा खोटेपणा समोर येतो,’ असा हल्लाबोल माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला.

येथे 16 ऑगस्ट रोजी पॉवरग्रीड, सोलापूर-पुणे महामार्गाचे लोकार्पण व सोलापूर-येडशी रस्त्यांचा कोनशिला अनवरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला राजकीय चिमटे काढले होते. त्याला शिंदे यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रत्युत्तर दिले. सोमवारी सकाळी काँग्रेस भवनात झालेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांसमोर ते बोलत होते.

काँग्रेस सध्या अडचणींतून पुढे जातोय. या दरम्यान पक्षाच्या मदतीला येणाराच पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असतो. पक्ष कधीच संपत नसून निष्ठावंतांच्या बळावर पुन्हा उभारी घेईल, असा आशावाद माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला. पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केलेले भाषण गोलमाल करणारे आहे. वीज, रस्ते व पाणी (बीएसपी) ही संकल्पना मोदींनी आता जाहीर केली. पण, मी 2009 मध्ये सोलापुरात त्याची सुरवात केली, असे शिंदे यांनी सांगितले. सोलापुरातील भाषणात पोलिसांना गणवेश शिवणे व धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, याची आठवण शिंदे यांनी करून दिली.

अनुल्लेख आणि आज कौतुक
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गांचे उद्घाटन, पॉवरग्रीडचे लोकार्पण झाले. त्या कामांना मंजुरी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आणली होती. त्याची कल्पना असतानाही मुख्यमंत्री चव्हाण यांनी त्यांच्या भाषणात शिंदेंच्या नावाचा उल्लेख टाळला होता. पण, सोमवारी काँग्रेस भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री चव्हाण यांनी शिंदेंच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले

सोलापूरसाठी ‘अच्छे दिन’
पृथ्वीराज चव्हाण यांनी नेहरू नगर येथील भाषणात आघाडी सरकारकडूनही सोलापूरला ‘अच्छे दिन’ दाखविण्याचा प्रयत्न केला. सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्याच्या कामांची 1400 कोटी रुपयांची योजना आहे. त्यातील 127 कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्यातील प्रकल्प अहवाल तातडीने मान्य केला जाईल, असे सांगितले. लिंगायत समाज आरक्षणाबाबत दिलीप सोपल समिती लवकरात लवकर निर्णय घेईल असे जाहीर केले. जुळे सोलापूर परिसरात एसटी स्थानक व्हावे यासाठी जागा मिळाली आहे, त्याला ताबडतोब मंजुरी दिली जाईल, सोलापूरकरांनी काळजी करू नये, असेही जाहीर केले.

मोदींनी केले फक्त मार्केटिंग : पृथ्वीराज चव्हाण
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा एवढा मोठा पराभव होईल, याची कल्पनाही नव्हती. राबवलेल्या योजना, केलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोचविण्यात कमी पडलो. त्याचाच सर्वाधिक फटका बसला. एखादी वस्तू बाजारात विक्रीसाठी आणण्यापूर्वी ज्या पद्धतीने त्याची जाहिरातबाजी करून मार्केटिंग करण्यात येते, त्याच पद्धतीने नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाचे लॉचिंग भाजपने केले. गुजरातपेक्षाही महाराष्ट्र सर्वात प्रगत राज्य आहे. पण, मोदींनी त्यांच्या गुजरातच्या विकासाच्या खोट्या जाहिराती करून सर्वांपुढे आणले. महाराष्ट्र व गुजरातच्या विकासाबाबत जाहीर चर्चा करण्याचे आव्हान मी मोदींना दिले होते. पण, त्याकडे दुर्लक्ष केले. मोदींची गुजरातमधील राजवट एकाधिकारशाहीची होती. तेथील अधिवेशन फक्त दोन दिवस चालायचे, इतर मंत्र्यांना महत्त्व नव्हते. पोलिसांचा वापर करून सर्वसामान्यांची हेरगिरी करायचे, अशी टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.