आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव नसणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ‘लोकसभा निवडणुकीत एक पक्ष स्वतंत्र विचारांवर लढत होता; तर इतर पक्ष युती, आघाड्या करून लढत होते. मतदारांना मात्र काँग्रेसला नाकारायचे होते. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले. पण विधानसभा निवडणुकीत असे चित्र राहणार नाही. राज्यात मोदींची लाट चालणार नाही,’ असा दावा करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधिमंडळातील गटनेते बाळा नांदगावकर यांनी भाजप-शिवसेनेने राज्याच्या सत्तेची स्वप्ने रंगवू नयेत, असा इशारेवजा सल्ला गुरुवारी येथे दिला.
कनगरा (जि. उस्मानाबाद) येथे पोलिसांच्या मारहाणीतील पीडितांच्या भेटीसाठी श्री. नांदगावकर गेले होते. तिथून परतताना त्यांनी सोलापूरच्या हॉटेल वैष्णवी येथे विर्शांती घेतली. तिथे पत्रकारांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीत मोदींची लाट होती, हे मान्य करताना पक्षाच्या पराभवाबद्दल त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. विधानसभा निवडणुकांना नव्या उमेदीने सामोरे जाऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी पक्षाचे सोलापूरचे पदाधिकारी युवराज चुंबळकर, दिलीप धोत्रे, भूषण महिंद्रकर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रात पोलिसांचे राज्य आहे?
कनगरा येथील गावकर्‍यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा नांदगावकरांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला. पुरोगामी महाराष्ट्रात लोकनियुक्त मंत्र्यांचे राज्य आहे, की आबांच्या (आर. आर. पाटील) मार्गदर्शनाखाली पोलिसांचे राज्य आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अवैध दारू विक्रेत्याला पकडून कारवाईची मागणी केल्यानंतर महिलांसह गावकर्‍यांना अमानुषपणे मारहाण करणार्‍या पोलिसांवर अँट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करा, अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी विधिमंडळ सदस्यांची समिती तत्काळ नियुक्त करावी, असेही ते म्हणाले. कनगर्‍यातील दारूविक्रेता राठोड याच्यावर मोक्का लावावा. तसेच त्याला ज्या पोलिसांनी पाठीशी घातले, त्यांना सहआरोपी करावे, पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक यांच्यासह दोषी पोलिसांना बडतर्फ करावे, अशा मागण्या त्यांनी मांडल्या. बेंबळे गावातील गुंडांना हाताशी धरून पोलिसांनी हैदोस घातला. अशा गुंडांवर दरोड्याचे गुन्हे दाखल केले पाहिजेत. मारहाणीत ज्या ग्रामस्थांचे नुकसान झाले, त्यांना शासनाने भरपाई द्यावी. याबाबत पावसाळी अधिवेशनात आवाड उठवू, असेही नांदगावकर म्हणाले.