आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सभेने भाजपात उत्साह, आता काँग्रेसकडून प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होतील, असे संकेत मिळू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सोलापुरात येऊन पॉवरग्रीड, सोलापूर-पुणे महामार्गाचे लोकार्पण आणि सोलापूर-येडशी रस्त्याचा कोनशिला अनावरण कार्यक्रम केला. त्यानिमित्ताने मोदींची सभा आणि त्यांच्या भाषणाने भाजपमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. सभा एकाअर्थाने निवडणुकीचीच असल्याचे जाणवत होते. मोदी यांनी केंद्रातील मागील यूपीए सरकारवर अप्रत्यक्ष टीका करण्याची संधी सोडली नाही. काँग्रेसही आता कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागली आहे. त्यादृष्टीने सोमवारी काँग्रेसची सभा होत आहे.
सोलापूर - सरकारी उपक्रमांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात आले होते. उद्घाटनाचा कार्यक्रम होम मैदानावर झाला. शनिवारी झालेल्या सभेत जमलेली कार्यकर्त्यांची गर्दी पाहता भाजपतही उत्साहाचे रंग भरूलागले आहेत.

शहर व जिल्ह्यात भाजपला तसे पाहता विधानसभेसाठी फारसा वाव नाही. जेमतेम तीन जागा भाजपच्या वाट्याला येतील, उर्वरीत जागांवर शिवसेनेचे उमेदवार असतील असे जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र भाजपने ‘शत प्रती शत भाजप’चा नारा दिला तर हा उत्साह उपयोगाला येऊ शकतो, अशा अटकळी बांधल्या जात आहेत. तसेच पक्षांतर्गत हेवेदाव्यांनीही पक्षाला पुरते घेरले आहे. शहर उत्तरमधून विजय देशमुखांना होणारा विरोध, ताकद असूनही पक्षात डावलले जात असल्याचे अस्वस्थ झालेले सुभाष देशमुख आणि विधानसभेवर डोळा ठेवून इच्छुक असलेले अनेक नेते यांच्यातील शह-काटशहाने राजकारण चांगलेच तापले आहे. शहर उत्तरमध्ये उमेदवारीसाठी नवीन प्रयोग केला जाण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. तर शिवसेनेच्या कुरघोडीनेही भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण केली आहे. तरीही मोदींचे अनेक मुद्दे जनतेला अपील करणारे ठरल्याने व मोदी मंत्राचा फायदा घेऊन जिल्ह्यातील राजकारण बदलून टाकायचे अशा प्रयत्नासाठी भाजपने आतापासून पावले उचलायला सुरुवात केली आहे.

महायुतीत अशी स्थिती असताना काँग्रेसही आता देशातील सत्ता गेली, आता राज्यातील तरी टिकली पाहिजे यासाठी कामाला लागली आहे. मोदी सभेने तयार केलेले भाजपमय वातावरण खोडून काढता येईल का याचा प्रयत्न काँग्रेस करणार आहे. सोलापूर महापालिकेने शहरात उभारलेल्या माजी मुख्यमंत्री (कै.) वसंतराव नाईक आणि शंकरराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणानिमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मंत्री येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसची नेहरू नगरात जाहीर सभाही होणार आहे. या सभेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे राजकीय भाषण तर होईलच, पण विकासाच्या पातळीवर ते सोलापूरसाठी कोणते निर्णय जाहीर करतात, कोणत्या कामांच्या मंजुरीच्या घोषणा करतात, रखडलेल्या सिंचन योजनांना निधी देतात का?, एलबीटी विषयीची अधिक स्पष्टता करतील का? यावरही काँग्रेसची निवडणूक तयारी अवलंबून आहे. राज्यातच नाही तर सोलापुरात काँग्रेस सोडून जाणार्‍या नेत्यांची गर्दी वाढू लागली आहे. शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे महेश कोठेच आता शिवसेनेत गेलेत, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके जाण्याच्या तयारीत आहेत. जिल्ह्यातून अनेक नेते गेलेत. त्यामुळे काँग्रेसला आता ताकदीचे उमेदवार ठरवण्यासाठीही मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. निवडणुकी अगोदरची ही लढाई जिंकणे महत्त्वाचे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस शहरात केलेल्या विकासकामांना कसे फोकस करते, यावरही बरेच काही अवलंबून आहे. सोमवारच्या जाहीर सभेतून काँग्रेस शक्तिप्रदर्शनही करेल. कार्यकर्त्यांत उत्साह आणण्याचा प्रयत्न होईल, पण प्रत्यक्ष निवडणुकीत उभे राहिलेले आव्हान, लोकांमधील नाराजी, पक्षातील बंडखोरी याचा सामना करण्याचा कोणता मंत्र कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री व नेते देतात याकडे लक्ष आहे.
शनिवार मोदींचा, सोमवार चव्हाण, शिंदे यांचा...
शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन प्रकल्पाचे उद्घाटन करतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेस सरकारला खूपच चिमटे काढले. मुख्यमंत्र्यांना या सभेत फारसे बोलता आले नाही. कार्यकर्तेही त्यांचे ऐकण्याच्या तयारीत नव्हते. ती भाजपची गर्दी होती, पण आता काँग्रेसच्या गर्दीसमोर मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भाषणावर काय उत्तर देतात का?, शिंदे यांनी आणलेले प्रकल्प होते, त्याचे मोदींनी उद्घाटन केले यावर स्वत: शिंदे हेही प्रत्युत्तर देतील का? याकडेही राजकीय वर्तुळात लक्ष लागून राहिले आहे.