आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहोळचे फरार बीडीओ इंगळेंना पोलिस कोठडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाेळ - निर्मल भारत अभियान अंतर्गत मोहोळ तालुका पंचायत समितीत सन २०१४ मध्ये वैयक्तिक शौचालय अनुदानात २९ लाख ७० हजार ५५० रुपयांच्या घोटाळ्यातील फरार संशयित आरोपी तत्कालीन गटविकास अधिकारी बिपीन इंगळे मंगळवारी दि. मोहोळ पोलिस ठाण्यात स्वत:हून हजर झाले. पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

अनुदान घोटाळ्याबाबत दैनिक दिव्य मराठीने पाठपुरावा केला होता. जून २०१४ रोजी प्रभारी गटविकास अधिकारी संजय आळतेकर यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात १३ जणांच्या विरोधात फिर्याद दिली होती. २९ लाख ७० हजार ५५० रुपयांच्या अनुदान गैरव्यवहाराच्या प्राथमिक चौकशी समितीच्या अहवालानुसार गुन्हा झाला होता. शौचालय बांधणीस कोटी रुपयांचे अनुदान आले होते. यातून सुमारे ८० ते ९० लाख रुपये अनुदान वाटप झाले. मात्र एकाच लाभार्थीच्या नावे १६ वेळा अनुदानाचे बोगस वाटप झालेे. मुख्य सूत्रधार शिक्षक हजरत शेख, तत्कालीन गटविकास अधिकारी बिपीन इंगळे यांच्यासह तीन विस्तार अधिकारी, प्रभारी गटविकास अधिकारी, लेखा अधिकारी, सहायक लेखा अधिकारी, तीन ग्रामसेवक, दोन प्रेरक अशा १३ जणांवर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
गतवर्षी संपूर्ण राज्यात गाजलेल्या मोहोळ पंचायत समितीमधील निर्मल भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय निधी वाटपात घोटाळा झाल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले होते. आजवर या प्रकरणातील १० संशयित जामिनावर आहेत, तर मुख्य सूत्रधार हजरत शेख आणि स्वच्छता प्रेरक समीर गायकवाड अद्याप फरार आहेत.