आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Money Of Temple Give To Dipressed Class Resolution Of Obc Sahitya Sammelan

मंदिरांतील पैसा वंचितांच्या कल्याणासाठी वापरा - ओबीसी साहित्य संमेलनाचा ठराव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - देशातील 5 लाख 75 हजार मंदिरांमध्ये 12 हजार 500 टन सोने आहे. 13 लाख कोटी रुपयांची दक्षिणा आहे. बहुजनांतील भोळ्याभाबड्यांचा हा पैसा वंचितांच्या कल्याणासाठी वापरावा, असा ठराव सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलनात रविवारी मांडण्यात आला.

ओबीसी परिषदेच्या वतीने आयोजित दुस-या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी झाला. या कार्यक्रमासाठी रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले, कर्नाटक मागासवर्ग महासंघाचे अध्यक्ष जी. के. सत्या, विद्रोही चळवळीचे पार्थ पोळके, महात्मा जोतिबा फुले यांच्या नातसून नीता होले, संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार, स्वागताध्यक्ष युवराज चुंबळकर, मुख्य निमंत्रक प्रा. राजन दीक्षित, माजी आमदार विश्वनाथ चाकोते आदी उपस्थित होते.

ओबीसी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत उपरे यांनी विश्लेषणासह ठरावांचे वाचन केले. देशात 52 टक्के असलेला ओबीसी समाज संघर्ष करून धर्मांतर करण्याच्या निर्णयाप्रत आला आहे. त्याची शासनाने दखल घ्यावी. जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी उपरे यांनी केली. त्यावर आठवले म्हणाले, ‘समस्त बौद्ध समाज ओबीसींच्या पाठीशी राहील. त्यांच्या उन्नतीसाठी हातात हात घालून काम करेल.’
संमेलनातील ठराव
* प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी अकादमी, ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हायला हवी, ओबीसी विद्यार्थी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणार
* सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव द्या, पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचे नाव द्या, मुंबई विद्यापीठाला संत तुकारामांचे नाव द्या
* औद्योगिक धोरणात ओबीसींना भूखंड द्या, विशेष घटक योजनेचा पैसा ओबीसींनाही द्या, संतांच्या क्षेत्रांना ‘अ’ दर्जा देऊन विकास करा
* अ‍ॅट्रॉसिटीचे संरक्षण ओबीसींनाही आवश्यक, जिल्हानिहाय महात्मा फुले भवन उभे करा, सोलापुरात दख्खनी भाषा अभ्यास केंद्र सुरू करा

मानसिक गुलामीतून बाहेर पडा
महिलांच्या प्रगतीला अडसर ठरणा-या कर्मकांडांना गाडून टाका व मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडा, अशी हाक चळवळीतल्या महिलांनी रविवारी संमेलनात दिली. ‘हिंदू महिलांचे कर्मकांड : शोकांतिका की प्रगतीतील अडसर?’ या परिसंवादात त्यांनी मते मांडली.

उषा दराडे : हक्क मिळवून घेण्यासाठी संघर्ष करावा लागेल. मागासवर्गातील महिला कर्मकांडातच अडकल्या. त्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडल्या तरच शिक्षण, आरोग्य मिळेल. चारित्र्य आणि चरित्र सांभाळण्याचा मक्ता फक्त बायकांनी घेतलेला नाही.
सुनीता रेणके : मुलगाच व्हावा असे संस्कार मिळाल्याने स्त्री जन्मापासूनच गुलाम होते. विविध कर्मकांडामध्ये त्यांच्या शारीरिक क्षमतेचे खच्चीकरण होते. त्यांनी जर अर्थकारण समजून घेतले तर परावलंबित्व दूर होईल. त्यासाठी स्त्रियांनी एकत्र यावे. परंतु व्यवस्था त्यांना एकत्र येऊच देत नाही.
प्रा. ज्योती वाघमारे : सर्व व्रत फक्त स्त्रियांसाठीच आहेत, पुरुषांसाठी एकही नाही. सातजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून महिला पूजा करतात. तो कसाही असला तरी पूजा करावीच लागते. ही केवळ गुलामी आहे. आम्ही सत्यवानाच्या सावित्रीची नव्हे, तर सावित्रीबाई फुले यांच्या कन्या आहोत. त्यांनी आम्हाला शिक्षण दिले, त्यांच्याच विचाराने आम्ही जाणार.