आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसा होतोय ‘कुरिअर’, बेकायदा व्यवहार राजरोसपणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - व्यक्तीला२० हजार रुपयांपेक्षा जादा रोकड जवळ बाळगता येणार नाही, असा कायदाच आहे. परंतु सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोट्यवधींच्या रकमा कुरिअरमार्फत सहज पाठवल्या जातात. करचुकवेगिरी करण्यासाठी ही रक्कम असते. रेल्वे, एसटी आणि खासगी वाहनांतून या पैशाची वाहतूक होते. एक तर पोलिसांनी पकडावे किंवा चोरांनी लुटावे, अशी स्थिती आहे. पुढे आयकर, विक्रीकर यंत्रणेपर्यंत हा पैसा जात नाही. त्यामुळे त्याचा हिशेबच कुणाला लागत नाही. चोरांनी आता या मोठ्या रकमांकडे लक्ष वेधले हे नातेपुतेजवळील घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले.

नातेपुतेजवळून (ता. माळशिरस) जाणारी बस अडवून चोरांनी कुरिअरच्या माणसांना बाहेर काढले. क्वालिस गाडीतून नेऊन त्यांच्याकडील २० लाख ६० हजार रुपये लुटले. २७ एप्रिलला ही घटना घडली. या प्रकरणातील दोघे संशयित रविवारी सापडले. परंतु ही रक्कम कोण, कुणाकडे, कशासाठी पाठवत होते, याचा छडा मात्र लागू शकला नाही. त्याचा तपास सुरू असल्याचे पोलिस सांगतात. आयकर अधिकार्‍यांनी यावर बोलण्यास नकार देत पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडून माहिती घेण्यास सांगितले.

जादा कमिशन, खास सोय : हवाल्याचीरक्कम पोहोचवण्यासाठी कुरिअरवाल्यांना जादा कमिशन आहे. लाख रुपयांमागे १०० रुपये मिळतात. एक माणूस २० लाख रुपये सहज नेतो. त्यासाठी शर्टाच्या आत अनेक खिसे असलेले जॅकेट घालताे. त्यात पैशाचे पुडके ठेवतो. आरामात झोपतो. अशा माणसांकडे बॅग किंवा इतर पिशव्याही नसतात. खिशात फक्त काही नावांचे कागद असतात.

‘ते’ पैसे परत दिले : निरीक्षक सातपुते
मागीलवर्षी रेल्वेने मुंबईला जाताना कुरिअरचे पैसे पोलिसांनी पकडले होते. तपासात हे पैसे कुरिअर मालकाचे असल्यामुळे त्यांनी आम्हाला पावत्या सादर केल्या. त्यानुसार कोर्टातून ते पैसे त्यांना परत देण्यात आल्याची माहिती लोहमर्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सातपुते यांनी दिली.

प्रकरणातील विसंगती
नातेपुतेपोलिस हद्दीत अठ्ठावीस एप्रिल रोजी कुरीयरचे 40 लाख रूपये लुटल्याची माहिती समोर आली होती. रविवारी पोलिसांनी पत्रकारांना चार लाख साठ हजार रूपये चोरीस गेल्याची माहिती दिली. प्रत्यक्षात पोलिसांनी वीसलाख साठ हजार रूपये जप्त केले आहेत. मग, त्या चोरांकडे सोळा लाख रूपये कुठून आले. अथवा चाळीस लाख चोरीस गेले असल्यास बाकीचे पैसे कुठे गेले. सर्वात महत्वाची बाब म्हणजे चारलाख चोरीस गेले असल्यास वीस लाख रूपये पोलिसांनी जप्त केले असले तरी बाकीच्या पैशांचे काय होणार? तपासातील ही विसंगती दूर होणे गरजेचे आहे.

आम्ही नाही करत
ऑनलाइन खरेदीत वस्तू पोहोचवून ग्राहकांचे पैसे संबंधित कंपनीला पोहोचवण्याचे काम आम्ही करतो. त्यावरील सेवाकर केंद्रीय उत्पादन शुल्क खात्याकडे भरतो. परंतु बेकायदा होणार्‍या व्यवहारांतील रकमा आम्ही कधीच स्वीकारत नाही. तशी कामे करणारे वेगळेच आहेत.” विकास सांगाने, क्वीक कुरिअर चालक

केंद्र राज्याचे कायदे वेगळे
खरेदी-विक्रीचा पैसा व्यवहारात दाखवला नाही. प्रत्यक्ष किंवा कुणामार्फत पैशांची देवाण- घेवाण झाली, तर ती रक्कम हवाला समजण्यात येते. या संदर्भात केंद्र राज्याचे कायदे वेगवेगळे आहेत. राज्याच्या कायद्यानुसार बेकायदा आढळून येणारी रक्कम ही खरेदी-विक्रीतून पुढे आलेली असावी; तरच त्याचा तपास करण्याचा अधिकार आहे. अन्यथा हा पैसा आयकर खात्याकडे सुपूर्त करण्यात येतो.” पुरुषोत्तम गावंडे, सहआयुक्त विक्रीकर विभाग

रेल्वेत सापडलेले २० लाख गेले कुठे?
गेल्यावर्षी रेल्वेस्थानकात एका कुरिअरच्या माणसाकडून २० लाखांची रक्कम रेल्वे पोलिसांनी जप्त केली. मानव अधिकार संघटनेचे कार्यकर्ते म्हणणारे त्याला पकडून दिले होते. पुढे ते रेल्वेत नोकरी मिळवून देतो म्हणून फसवणूक करणारे भामटे निघाले. त्यांना अटक झाली. पण त्या २० लाखांच्या रकमेचे पुढे काय झाले, माहीत नाही.

ही तर हवाला सारखी भानगड?
व्यवहारातूनकरचुकवेगिरी करण्यासाठी रोख रकमांची देवाण-घेवाण होते. त्याला हवाला म्हणतात. हा पैसा कुरिअरमार्फत पाठवला जातो. पाठवणार्‍याचे फक्त नाव असते. ज्याच्याकडे सुपूर्त करायची असते, त्याचा पत्ता असतो. त्यामुळे व्यवहार कशाचे झाले, याचा थांगपत्ता लागत नाही. सोलापुरातून बहुतांश हवाल्याची रक्कम गुजरातकडे रवाना होते.