आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - कुरिअर ही टपाल सेवा देणारी यंत्रणा आहे. पण या यंत्रणेमार्फत आता बेकायदेशीर पैशाची ने-आण करण्यासाठी प्रयत्न होऊ लागले आहेत. कोणतीही कागदोपत्री नोंद नसलेल्या पैशाचा ‘प्रवास’ घडवून आणता येऊ शकतो, ही खात्री असल्याने व्यापारात हे प्रयोग होऊ लागले आहेत. मात्र, या व्यवहारावर कायदेशीररीत्या फारसे नियंत्रण नाही, त्यामुळे तो बिनबोबाट सुरू आहे.
सोलापुरातही मोठे जाळे
सोलापुरात बराचमोठा व्यापारीवर्ग आहे. त्यांचे मुंबई, पुणे, सूरत, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यातील व्यापार्यांशी संबंध आहेत. येथील एका व्यापार्याला दुसर्या शहरातील व्यापार्याकडून काही रक्कम येणे किंवा तिच रक्कम तिसर्या व्यापार्याला देणे असेल तर बहुतेकजण बँकांचा वापर न करता ‘कुरिअर’मार्फत पैसे देणे पसंत करतात. या प्रकाराचे जाळे सोलापुरात चांगलेच वाढले आहे.
हजाराला पाच रुपये कमिशन
एक लाख पाठवायचे असतील तर त्याच्या मोबदल्यात कुरिअरचालकास 500 रुपये कमिशन मिळते. 450 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असेल तर त्याचा दर वाढतो. तसेच योग्य त्या व्यक्तीस ही रक्कम मिळाल्यावर कुरिअरचालकास बक्षिस मिळते ते वेगळेच, असे एका कुरिअर चालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
सांकेतिक शब्दावर व्यवहार
व्यवहारासाठी सांकेतिक शब्द किंवा मोबाइलवर एक प्रकारचा क्रमांक पाठवला जातो. एका व्यापार्याकडून घेतलेली रक्कम संबंधितांपर्यंत पोहोचवणे हे जोखमीचे काम असते. प्राप्तीकर व व्हॅट भरण्यापासून सुटका होते.
धोका काय..
व्यवहारात भिस्त असते ती विश्वासावरच. यात गफलत झाल्यास, कुरिअर कर्मचार्याने किंवा चोराने रोकड लांबवल्यास पोलिस कारवाई करता येत नाही. प्रसंगी व्यापार्यास रकेमवर पाणी सोडण्याची तयारी ठेवावी लागते.
कसा होतो..
खात्रीच्या कुरिअर सेवा कंपनीला इप्सित स्थळ, व्यक्तीच्या माहितीसह रोकड हवाली केली जाते. कर्मचारी ही रक्कम घेऊन संबंधित शहरात, व्यक्तीस सुपूर्द करतो.
कशासाठी..
बँक आदी माध्यमातून मोठय़ा रकमेचा व्यवहार झाल्यास त्याची नोंद होते. ती रक्कम कोठून आली हे आयकर विभागास खुलासा करावा लागतो. हे टाळण्यासाठी..
रोख रकमेचा होतोय अवैध प्रवास
पार्सल तपासतोच
ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात पार्सल पाठवले जातात. संशयास्पद किंवा वेगळ्या प्रकारचे पार्सल वाटल्यास ते तपासतो. किंवा संबंधितासच ते उघडून दाखवावे असे सांगतो. तरीही काही ठिकाणी असे प्रकार होतात हे ऐकून धक्का बसला.’’ एस. ए. चौगुले, व्यवसाय वाढ अधिकारी, घाडगे-पाटील ट्रान्सपोर्ट
असे प्रकार चालतात
काही जुन्या कुरिअर सर्व्हिसेसमध्ये अजूनही विश्वासार्हतेवर असे पैसे देवाण-घेवाणीचे व्यवहार चालतात. मोहापायी हे घडते. बँकिंग व्यवहारापेक्षा हा प्रकार स्वस्त आहे; पण यात रिस्कही आहेच.’’
आनंद देवकते, शाखा व्यवस्थापक, डीटीडीसी कुरिअर
आयकर खात्याकडून कारवाई
प्रवासात 15 ते 20 हजार रुपये नेता येतात. या पुढील व्यवहार धनादेशाद्वारे करणे अपेक्षित आहे. अन्य मार्गाने पैसे जात असतील तर त्याची तपासणी चलन अधीनियम अंतर्गत आयकर विभागाकडून होते. पोलिस खात्याचा या प्रकरणाशी थेट संबंध येत नाही.’’
पी. आर. पाटील, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा
.. तर शिक्षा होऊ शकते
रेल्वे पोलिसांनी जप्त केलेली ती रक्कम जर त्या कुरिअर चालकांच्या हिशेबातील असेल तर त्यांना अडचण येणार नाही. जर या रकमेचा त्यांच्याकडे हिशेब नसेल अथवा ती कशासाठी वापरण्यात येणार आहे, या बाबतची नोंद नसेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्या रकमेच्या हिशेबावर अवलंबून आहे.’’
राज मनियार, सनदी लेखापाल
पैसे पाठवण्याच्या अधिकृत सेवा
वेस्टर्न युनियन मनी ट्रान्स्फर (बँकेमार्फत)
इलेक्ट्रिक फंड्स ट्रान्स्फर (इंटरनेट)
ई-बँकिंग (इंटरनेट)
वायर ट्रान्स्फर (बँकेमार्फत)
मनी ऑर्डर (पोस्ट)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.