आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी रविवारी रात्री रेल्वे स्थानकावर तिघा कुरियर सेवकांजवळील बावीस लाख रुपये जप्त केले होते. त्या तिघांना मंगळवारी दौंड न्यायालयाने जामिनावर मुक्त केले. दरम्यान, नर्मदा, पद्मावती, क्विक या तीन कुरिअर कंपन्यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती फौजदार दत्तात्रय चाबुकस्वार यांनी दिली. रविवारी रात्रीच आयकर विभागाच्या अधिकार्यांनी या पैशाबाबत माहिती जाणून घेतली आहे. पोलिसांना या घटनेचा अहवाल देण्यास सांगितले आहे. तपासानंतर त्यांना अहवाल देण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.
राजेंद्र बुलबुले, आनंद बुलबुले, संदीप चौगुले या तिघांना अटक झाली होती. तिघेजण कुरिअर कंपनीत मुंबईला पैसे पोचवण्याचे काम करतात. ते पैसे सोलापुरातील कुरिअरमधून मुंबईत संबंधित कुरिअरला देणे एवढीच जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे तपासात ठोस अशी माहिती मिळाली नाही. कुरिअरचालकांची चौकशी करून नेमके हे पैसे कुणाला देण्यात येणार होते, कोणी दिले होते याची माहिती मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसाला न्यायालयीन कोठडी
दोनशे रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आलेल्या प्रल्हाद दौलत चव्हाण या पोलिसाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी मंगळवारी न्यायालयीन कोठडी दिली. 5 फेब्रुवारी रोजी जामिनावर सुनावणी होणार आहे. संजोग सुतरगावकर (रा. सुंदरमनगर, विजापूर रोड, सोलापूर) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यांचा मोबाइल हरवल्याच्या दाखल्यासाठी चव्हाण यांनी दोनशे रुपयांची लाच मागितली होती. चव्हाण यांच्यातर्फे अँड. सुरेश पाटील-कुरूलकर यांनी काम पाहिले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक शंकर चव्हाण, पोलिस निरीक्षक महादेव कुंभार, संगिता हत्ती यांच्या पथकाने सोमवारी केली.
पोलिसांच्या हातावर ‘तुरी’
मार्केट यार्डतील गाळा नंबर सी-सात मधील सिद्धलिंगेश्वर ट्रेडर्स दुकानातून 68 पोती तूर चोरांनी पळवली. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. कल्लप्पा धानप्पा कांबळे यांनी जेल रोड पोलिसांत फिर्याद दिली आहे. प्रत्येकी साठ किलो वजनाची ती पोती होती. त्यांची किंमत एक लाख 70 हजार रुपये आहे. शटरचे कुलूप तोडून चोरांनी तूर पोती पळवली. फौजदार माळी तपास करत आहेत.
रेल्वेखाली तरुणाचा मृत्यू
कंबर तलावजवळ रेल्वेखाली आल्याने रफीक रजाक शेख (वय 24, रा. लोकमान्यनगर, आसरा, सोलापूर) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. लोहमार्ग पोलिसात याची नोंद आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.