आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आनंदने आता संसारशिखरही सर करावे ही इच्छा’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘पुत्र आनंदने सर्व सुख दिले. त्याच्या यशाने आम्ही आई-वडील दोघेही समाधानी झाले आहोत. आता आणखी एक इच्छा त्याने पूर्ण करावी. आपला जोडीदार शोधून त्याने संसार शिखरही सर करावे. त्याच्या आयुष्याला आणखी सुखाचा स्पर्श झाल्याचे मला पाहायचे आहे’, असे भावोद्गार गिर्यारोहक आनंद बनसोड याच्या आई पार्वती बनसोडे यांनी काढले.

जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करणार्‍या आनंदने नुकतेच युरोप खंडातील सर्वोच्च शिखर एल्ब्रुसही पादाक्रांत केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आनंदच्या आईशी ‘दिव्य मराठी’ने संवाद साधला. या वेळी आई पार्वती यांनी आनंदच्या आठवणींना उजाळा दिला.

‘घरच्या गरिबीचा त्याने कधीही बाऊ केला नाही. आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढत आनंदने अडचणींशी सदैव दोन हात केले. चिकाटी आणि कष्टाळूपणाच्या वृत्तीनेच आज त्याला यशाच्या शिखरावर नेले. तो आज विख्यात झाला आहे. मात्र त्याआधी त्याने घरची स्थिती जाणली. लहानपणापासूनच तो समजदार आहे. तसा तो हट्टीही आहे. त्यामुळेच त्याने कधीही कामाच्या आडअपयश येऊ दिले नाही. मला हे हवे, ते हवे असा हट्ट त्याने कधीच धरला नाही. जे दिले त्यावर त्याने समाधान मानले.’
मी सुखाचे पर्वत अनुभवले
आम्ही दोघांनीही मुलांना कधी गरिबीची झळ पोहोचू दिली नाही. आम्हाला तीन मुली आणि एक मुलगा आहे. मुलांना शिक्षण मिळावे, त्यांचे हाल होऊ नये म्हणून पती अशोक यांना मी हातभार लावत होते. मागे वळून पाहताना आनंदने दिलेल्या सुखापुढे, त्याच्या नाव लौकिकापुढे मागील सर्व कष्ट, दु:ख पालापाचोळ्यासम वाटते. त्याच्या यशाच्या शिखराने मी सुखाचे पर्वत अनुभवले. त्याने आणखी पुढे जात राहावे, थांबून नये. पार्वती अशोक बनसोडे, आनंदची आई

आनंद आज सोलापुरात
युरोपातील सर्वोच्च् शिखर एल्ब्रुस चढाईची मोहीम यशस्वी करून आनंद बनसोडे गुरुवारी सकाळी 9 वाजता शताब्दी एक्सप्रेसने सोलापुरात परतत आहे. 11 ते 18 जुलै रोजी ही मोहीम राबविली गेली होती. 17 जुलै रोजी 10.32 वाजता तिरंगा हवेत लहरला. आनंदने शिखरावर राष्ट्रधून वाजवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा झळकवली होती. मित्र परिवाराच्या वतीने सकाळी आनंदच्या कुमठा नाका येथील निवासस्थानापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे.