आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुभाष देशमुख यांचा राजीनामा; महायुतीपुढे पेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - लोकसभा निवडणुकीत उस्मानाबादमधून उमेदवारी न मिळाल्याने भाजपचे नेते व माजी खासदार सुभाष देशमुख यांनी पक्ष सोडण्याच्या निर्णय भाजपला कळवला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत देशमुख गटाचा प्रभाव असलेल्या उस्मानाबाद, माढा व सोलापूर येथील महायुतीच्या उमेदवारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

उस्मानाबादमधून महायुतीतर्फे शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी मिळाली आहे, त्याविरुद्ध रोहन देशमुख यांनी शड्डू ठोकला आहे. रोहन हे सुभाष देशमुख यांचे चिरंजीव असल्याने भाजपमध्ये त्याचे गंभीर राजकीय पडसाद उमटले आहेत. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत देशमुखांनी माढा लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. देशमुख यांच्या पवित्र्याने या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनाही दुखावली; सोलापुरात पेच
उस्मानाबादमधील या घडामोडीने महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेली शिवसेना दुखावली असून सोलापुरात भाजप उमेदवाराला मदत करायची नाही असा निर्णय तुर्ततरी घेतला ओह. याबाबतची शिवसेनेची पुढील भूमिका मातोश्रीवरुन येणार आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघात महायुतीचे अ‍ॅड. शरद बनसोडे यांच्या प्रचारात शिवसेना तटस्थ आहे. त्यामुळे भाजपापुढे पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेला वगळून नियोजन करणे भाजपाला अडचणीचे ठरत आहे.

उस्मानाबादेत फटका कोणाला?
रोहन देशमुख यांच्या उमेदवारीमुळे उस्मानाबादेत महायुतीपुढे मोठी तेढ निर्माण झाली आहे, त्यांच्या उमेदवारीचा फटका महायुतीला बसणार की राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, खासदार पद्मसिंह पाटील यांना? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. रोहन देशमुख यांच्या प्रचारात सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या लोकमंगल ग्रुपने आपली यंत्रणा महत्त्वाची भूमीका बजावेल असे दिसते.

- सध्या मला भाजपात कोणतेच काम नाही, कोणतीही जबाबदारी माझ्यावर दिली गेली नाही. उस्मानबादमधून संधी मिळेल असे वाटले होते. रोहन देशमुख यांनी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्याच दिवशी आपण भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारीपदाचा राजीनामा पाठवून दिला आहे. पक्ष काय निर्णय घेतो हे पहावे लागेल. - सुभाष देशमुख (माजी खासदार)

दोन दिवसात पक्षाचा निर्णय
उस्मानाबादमधून रोहन देशमुख अपक्ष म्हणून लढताहेत, त्यामुळे त्यांचे वडील सुभाष देशमुख यांच्याबाबत प्रदेश पातळीवर दोन दिवसात निर्णय घेतला जाईल.- माधव भंडारी, (प्रदेश प्रवक्ते, भाजप)

मी सोलापुरात महायुतीचा प्रचार करेन
माझ्याकडे सोलापूर लोकसभा मतदार संघातील जबाबदारी आहे. त्यामुळे मी अ‍ॅड. शरद बनसोडे यांचाच प्रचार करेन. त्यांना निवडून आणण्यासाठी माझी ताकद वापरेन. सोलापुरची जबाबदारी असल्याने मी उस्मानाबादमध्ये महायुतीचा प्रचार करण्याचा प्रश्न नाही. - शहाजी पवार, (जिल्हाध्यक्ष, भाजप)

देशमुखांचा राजीनामा हे दुर्देव
सुभाष देशमुख यांनी सोलापुरात भाजपाचे खासदार राहिले. त्यांनी पक्षासाठी काम केले. त्यांचा मुलगा रोहन उस्मानाबादमध्ये बंडखोरी केली. हा प्रकार दुदैवी आहे. (विजय देशमुख, आमदार व शहरध्यक्ष, भाजप)