आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादा आठवणीत रमले चार गोष्टी सांगून गेले, पदाधिका-यांच्या आग्रहाने गेले जिल्हा परिषदेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना ५०० पाझर तलावांची कामे सुरू केली. अगोदर नारळ फोडून उद्घाटन करायचे अन् पुन्हा मंजुरीची प्रक्रिया करायचो. दुष्काळात लोकांच्या हातांना कामे देण्यासाठी त्याशिवाय पर्याय नव्हता.
ग्रामविकास मंत्री असताना झेडपीसाठी अनेक योजना सुरू करून निधी मिळवून दिला, सत्तास्थानी असताना केलेली कामे अन् राबविलेल्या योजनांच्या आठवणी सांगण्यात खासदार विजयसिंह मोहिते रमून गेेले.
जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव खासदार मोहिते सोमवारी झेडपीत आले होते. पक्षनेते धैर्यशील मोहिते यांच्या दालनात पदाधिकारी, अधिकारी निवडक कार्यकर्त्यांसमेवत गप्पांची मैफल रंगली होती. खासदार मोहिते म्हणाले, ‘नामदेवराव जगताप हे झेडपीचे अध्यक्ष असताना फक्त पाच पाझर तलाव मंजूर झाले अन्् त्याच्या उद््घाटनाचा फार मोठा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर मी अध्यक्ष झाल्यानंतर पाझर तलावांची मोठी कामे सुरू केली. माझ्या कार्यकाळात शासकीय योजना नव्हत्या. पूर्वी फक्त कुटुंबनियोजन अल्पबचत या दोनच योजनांची जबाबदारी झेडपीवर होती, असेही त्यांनी सांगितले.

मागासवर्गीयांसाठी योजना राबवा
समाजकल्याणविभागास कामे करण्याची खूप चांगली संधी आहे. त्यासाठी वर्धा जिल्हा परिषदेने राबविलेल्या योजनांची माहिती घ्या. पारंपरिक योजनांऐवजी ग्रामीण भागातील मागासवर्गीय कुटुंबीयांसाठी खूप चांगल्या नव्या योजना राबविता येतील, अशा सूचना त्यांनी समाजकल्याण समितीच्या सभापती कल्पना निकंबे यांना दिल्या. महिला बालकल्याण समितीच्या सभापती सुकेशिनी देशमुख यांनी पंढरपूर पंचायत समितीच्या आढावा बैठकीस बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित राहत नसल्याची तक्रार केली. त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्रीनिवास जोशी यांना संबंधितांना समज देण्याच्या सूचना मोहितेंनी दिल्या.

... अन् भुवया उंचावल्या
रस्त्यांच्याकामांसाठी झेडपी ऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सर्व निधी मिळायचा. झेडपीला प्रत्येक कामांसाठी सार्वजनिक बांधकामवर विसंबून राहावे लागायचे. झेडपीची त्यावेळची स्थिती म्हणजे ‘हाती लगाम नसलेल्या घोड्यावर बसल्यासारखी’ होती. मी ग्रामविकास मंत्री असताना झेडपीच्या रस्त्यांना निधी मिळण्यासाठी २५-१५ या विशेष हेडद्वारे निधीची तरतूद करून दिली, अजूनही त्याद्वारे योजना सुरू आहेत का? असा प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. लेबर फेडरेशनऐवजी झेडपीमध्ये कामे वाटप करण्याबाबतचा आदेश मीच काढला. त्यासाठीची कारणे वेगळी होती, असे सांगताच अनेकांच्या भुवया उंचावल्या.