आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडळांच्या प्रबोधनाकरिता महावितरणची दामिनी पथके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सार्वजनिक उत्सवात विजेचा धक्का बसून अपघात होऊ नये, यासाठी महावितरणने ‘दामिनी’ पथके तैनात केली आहेत. ‘सुरक्षित सार्वजनिक वीज वापर’ यासंदर्भात पथके प्रबोधन करणार आहेत. रीतसर हंगामी वीज कनेक्शन घेऊन विना अपघात उत्सव कसा साजरा करावा, यावर दामिनी पथकाचा भर असेल. शहरात प्रत्येकी पाच महिलांचा सहभाग असलेली ही पाच पथके अनधिकृत वापर करणार्‍या मंडळांची पाहणीही करणार आहेत. त्यामुळे अवैध वीज वापर करणार्‍यांना कदाचित कायदेशीर सामन्यास सामोरे जावे लागेल.

उत्सव काळात शेजारील निवासी अथवा व्यवसायिक ग्राहकांकडून वीज घेण्यावर मंडळांचा कल असतो. काहीजण बिनधास्त पालिका अथवा वीज मंडळांच्या तारांवरून वीज घेतात. परंतु त्यामुळे दुर्घटना घडण्याच्या शक्यता असतात. त्यासाठी महावितरणने प्रबोधनाचा उपक्रम हाती घेतला आहे, मुख्य लाइनमध्ये 11 हजार व्होल्ट तर स्ट्रीटलाइनवर 220 व्होल्टचा दाब असतो. वीज विभागाचे शहरात पाच झोन आहेत. प्रत्येक झोनमध्ये एक दामिनी पथक तैनात केले आहे. महिला कर्मचार्‍यांच्या जनमित्र पथकात एक कनिष्ठ अभियंता असेल.

तात्पुरते वीज कनेक्शनच फायद्याचे
घरगुती अथवा व्यवसायिक वीज ग्राहकास साडे चार ते सहा रुपये प्रतियुनिट दर आकारला जातो. उत्सव काळात तात्पुरते वीज कनेक्शन घेतले तर त्यांना 3 रुपये 27 पैसे प्रतियुनिट दर आकारणी केली जाते. त्यामुळे व्यावसायिकांकडून वीज घेण्यापेक्षा महावितरणकडून सुरक्षित वीज घेणे फायद्याचे ठरते. वीज कनेक्शन घेताना केवळ एक हजार रुपये डिपॉझिट भरावे लागणार आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर बिल अदा करताच डिपॉझिट परत मिळते.

27 मंडळांना अधिकृत विद्युत कनेक्श्न
सोलापूर शहरातील 1351 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यापैकी 27 मंडळांनी अधिकृतपणे वीज कनेक्शन घेतले आहे. चार मंडळांनी कनेक्शनसाठी मंगळवारी अर्ज केला आहे. 27 वगळता इतर मंडळे विजेचा वापर कसा व कोठून करतात याची पाहणी केली जाणार आहे. त्यासाठी दामिनी पथके तैनात केलेली आहेत.

दोन तासांत मिळेल जोडणी
इतरांकडून किंवा अनधिकृतपणे वीज कनेक्शन घेणे कधीही फायद्याचे ठरत नाही. त्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी अधिकृत वीज कनेक्शन घ्यावे. अर्ज सादर केल्यानंतर अवघ्या दोन तासांत त्यांना वीज कनेक्शन मिळेल. दामिनी पथकांकडून मंडळांची जनजागृती केली जाणार आहे. अवैध वीज वापर करणार्‍या मंडळांची पाहणी करण्यात येणार आहे. आर. आर. कांबळे, कार्यकारी अभियंता