आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवहन कर्मचार्‍यांकडून अचानक ‘चक्का जाम’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिका परिवहन कर्मचार्‍यांनी थकीत वेतनासाठी सोमवारी पहाटेपासून अचानकपणे कामबंद आंदोलन सुरू करून सिटीबसचा चक्का जाम केला. 70 बस सात रस्ता डेपोत थांबल्या. तीन महिन्यांच्या वेतनासाठी लागणारे दोन कोटी 25 लाख रुपये द्या, अशी मागणी केली. 35 लाख रुपये देण्याची तयारी महापौर अलका राठोड यांनी दाखवली. त्यामुळे संप सायंकाळी मागे घेण्यात आला.

नागरिकांचे हाल : सिटीबस धावणार नसल्याची कल्पना सोलापूरकरांना नव्हती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. सकाळी साडेसहापासून बसची वाट पाहत विद्यार्थी स्टॉपवर उभे होते. काहींनी शाळेला सुटी घेतली. काही पालकांनी दुचाकीवर पाल्यांना सोडले. अवैध प्रवासी वाहतूक जोमाने सुरू होती. दूरवरच्या होटगी रोड, विजापूर रोड, विडी घरकुल, गोदूताई परूळेकर विडी वसाहत, नीलम नगर, अशोक चौक परिसरात प्रवाशांचे हाल झाले.

.. राजकीय पोळीसाठी : सत्तेतील अँड. यू. एन. बेरिया आंदोलन करून राजकीय पोळी भाजून घेत आहेत. परिवहनची अशी अवस्था आणण्यास ते जबाबदार आहेत, असा आरोप नगरसेवक आनंद चंदनशिवे आणि परिवहन विरोधी पक्षनेता मल्लिनाथ याळगी यांनी केला.

दोन महिन्यांपूर्वी दिली सूचना
परिवहन डबघाईत येण्यास अधिकारीच जबाबदार आहेत. पूर्णवेळ परिवहन व्यवस्थापक दिले नाही. कारभारावर कोणाचाही अंकुश नाही. आंदोलनाची कल्पना त्यांना दोन महिन्यांपूर्वी दिली होती.’’ - अँड. यू. एन. बेरिया

महापौरांच्या निवासस्थानी बैठक
महापौर अलका राठोड यांनी निवासस्थानी बैठक घेतली. पदाधिकारी, अधिकारी व परिवहन समितीचे सदस्य बैठकीस होते. परिवहन सदस्य अख्तर मणियार आणि आयुक्त सावरीकर यांच्यात खडाजंगी झाली. परिस्थितीस अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप मणियार यांनी केला. सभागृह नेते महेश कोठे, दिलीप कोल्हे, अँड. बेरिया, चंदनशिवे, परिवहन सभापती सुभाष चव्हाण, आयुक्त अजय सावरीकर, साहाय्यक आयुक्त डॉ. पंकज जावळे, अजित खंदारे आदी उपस्थित होते.

आयुक्तांच्या दालनात स्वतंत्र चर्चा
आयुक्त अजय सावरीकर यांच्या दालनात कामगार संघटनेचे नेते अँड. यू. एन. बेरिया आणि नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. महापालिकेची स्थिती पाहता, रकमा देणे शक्य नाही. 28 लाख रुपये दिले त्यातून वेतन करावे, अशी भूमिका आयुक्तांची असल्याची माहिती अँड. बेरिया यांनी दिली.

आयुक्तांच्या घरासमोर ठिय्या
सात रस्ता डेपोत कर्मचार्‍यांनी ठिय्या आंदोलन केले. परिवहन व्यवस्थापक ए. ए. पठाण यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचारी आक्रमक होते. त्यानंतर रेल्वे लाइन परिसरातील आयुक्तांच्या निवासस्थानासमोर आंदोलन झाले.

चार लाखांचा फटका
सायंकाळी काही मार्गावर बस धावल्या. मंगळवारी सेवा सुरळीत होईल, अशी माहिती परिवहन व्यवस्थापक ए. ए. पठाण यांनी दिली. रोज 50 हजार जण प्रवास करतात. चार लाख रुपयांचा फटका बसला.
अटक, सुटका : जमावबंदीचा आदेश मोडल्याच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी नगरसेवक अँड. बेरिया यांच्यासह 15 कामगारांना महापौर निवासस्थानातून अटक केली. नंतर जामिनावर सोडले.