आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर- हुतात्मा कुर्बान हुसेन अल्पसंख्याक महिला कामगार सहकारी गृहनिर्माण योजनेला अनुदान देण्यासाठी केंद्र अनुकूल आहे; परंतु राज्य शासन प्रतिसाद देत नाही. जानेवारीपर्यंत मागण्या मान्य न केल्यास मुंबईला पायी मोर्चा काढणार असल्याची घोषणा संस्थेचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम यांनी रविवारी केली.
संस्थेची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा कुंभारी येथे झाली. त्या वेळी ते बोलत होते. या सभेसाठी संस्थेच्या 12 हजार सभासद महिला उपस्थित होत्या. आडम पुढे म्हणाले, ‘अल्पसंख्याकांना घरकुले देण्यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य अपेक्षित आहे; परंतु तसे घडत नाही. काही हस्तकांना हाताशी धरून संस्थेच्या विरोधात षड्यंत्र रचले जात आहे. जनरेट्याच्या माध्यमातून घरकुलांसाठी आवश्यक निधी खेचून आणण्याची आमची हिंमत आहे. जे कोणी हस्तक असतील त्यांना तुडवून पुढे निघण्याची तयारी आहे. त्यासाठी सभासदांचे सहकार्य अपेक्षित आहे. मुंबईला पायी निघण्याची तयारी त्यांनी ठेवावी.’ संस्था अध्यक्षा नलिनी कलबुर्गी, सचिव युसूफ मेजर, अल्लाबक्ष पटेल, बालाजी महेशन, सिद्धप्पा कलशेट्टी, माशप्पा विटे आदी संचालक व्यासपीठावर होते.
महाप्रकल्पाचे मॉडेल
या संस्थेच्या घरकुलांसाठी 22 हजार सभासद झाले. नियोजित घरांचे नमुने कुंभारी कार्यस्थळावर बांधण्यात आले आहे. ते पाहण्यासाठी महिलांची रविवारी झुंबड उडाली. या महाप्रकल्पात मशीद, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, उद्याने, अंगणवाडी, व्यापार संकुले, स्मशानभूमी आदी सुविधा असणार आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.