आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरसाठी मुंबई विभागच;रिझर्व्ह बँकेचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - बँकेच्या नागपूर विभागीय कार्यालयाशी सोलापुरातील नागरी सहकारी बँकांचे कामकाज जोडले होते. भौगोलिकदृष्ट्या ते गैरसोयीचे असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर मुंबईतील कार्यालयच पूर्ववत ठेवण्यात आले. रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक एस. कुरुप्पा स्वामी यांनी याबाबतचे पत्र सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनला पाठवले. त्यामुळे बँक संचालकांनी नि:श्वास सोडला.

रिझर्व्ह बँकेच्या मुंबई कार्यालयातच सोलापूरच्या नागरी सहकारी बँकांचे कामकाज चालत होते. परंतु एक एप्रिलपासून ते नागपूर कार्यालयाला जोडण्यात आले होते. त्याच्या विरोधात असोसिएशनने ठराव केला. सोलापूर ते नागपूर सातशे किलोमीटर अंतर आहे. त्याने प्रवास, वेळ आणि पैशाचा मेळ बसत नाही. सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या सातत्याने सूचना असतात. त्याच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा असतो. त्याशिवाय आर्थिक आढाव्याच्या बैठका, सुनावण्या असतात. त्यासाठी प्रत्यक्ष भेटी घ्याव्या लागतात. या सर्व बाबींसाठी नागपूरचे विभागीय कार्यालय सोयीस्कर नाही. त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ देणे परवडणारेही नाही, असे असोसिएशनने सातत्याने रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आणून दिले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची सोलापूरच्या दौर्‍यात भेट घेऊन कैफियत मांडली. असोसिएशनच्या या सर्व प्रयत्नांची दखल घेऊन रिझर्व्ह बँकेने निर्णय बदलला.

असोसिएशनच्या पाठपुराव्यात ज्येष्ठ संचालक मोहन दाते, उपाध्यक्ष संगीता फाटे, लोकमंगल बँकेचे अध्यक्ष सुभाष देशमुख, विकास बँकेचे राजगोपाल मिणियार, व्यवस्थापक पांडुरंग मंत्री, राजगोपाल झंवर, राजेंद्र कोठावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश सोनटक्के, सर्मथ सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक उमेश थोब्बी आदींनी पर्शिम घेतले.

नकाशा घेऊनच बसलो..
रिझर्व्ह बँकेने एकदा निर्णय घेतला आणि त्यात बदल केले, असे कधी होत नाही. तेथील वरिष्ठ अधिकारी दक्षिण भारतातील, पश्चिम बंगालमधील असतात. त्यामुळे भाषेची अडचण येते. मराठी माणूस अपवादानेच सापडतो. अशा स्थितीत कार्यकारी संचालक एस. कुरुप्पा स्वामी यांना सोलापूर-नागपूरचे अंतर सांगण्यासाठी नकाशा घेऊन समोर बसावे लागले. त्यांना पटवून देणे कठीणच होते. तरीही असोसिएशनच्या वतीने पाठपुरावा सुरूच ठेवले. त्याला यश मिळाले. जगदीश तुळजापूरकर, अध्यक्ष बँक्स असोसिएशन