सोलापूर- महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी शहराच्या विकासकामांचे अनेक प्रस्ताव तयार केले आहेत. या प्रस्तावांमध्ये शासकीय अनुदान, योजना, महापालिका निधीतून करायची कामे आदींचा समावेश केला आहे. शौचालय बांधणे, रस्ते तयार करणे, बागा विकसित करणे आदी सुमारे 81 कोटींच्या कामांचा प्रस्ताव आयुक्तांनी सभागृहापुढे ठेवला आहे. त्यावर 17 जून रोजी होणार्या सभेत चर्चा होणार आहे.
शहरातील जागा खासगी संस्थेला देण्यासाठी मनपा प्रशासनाचा विरोध असताना रूपाभवानी मंदिराजवळ असलेले मंगल कार्यालय डीके मागासवर्गीय संस्थेस देण्याचा प्रस्ताव नगरसेवक चेतन नरोटे आणि फिरदोस पटेल यांनी दिला आहे. महापालिकेत बसप आणि राष्ट्रवादी पक्षाला कार्यालय हवे असल्याने त्यासाठी त्या पक्षाने प्रस्ताव दिला आहे.
मनपा जागांची मागणी
महापालिकेच्या जागा मागण्याचा सपाटा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच हॅलो मेडिकल फाउंडेशन संस्थेसाठी दाराशा हॉस्पिटलच्या मजल्यावरील दोन खोल्या पाच वर्षासाठी देण्याचा प्रस्ताव आहे. बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे आणि राष्ट्रवादीचे दिलीप कोल्हे यांनी स्वतंत्र कार्यालयासाठी जागेची मागणी केली आहे. तत्कालीन आयुक्तांनी शासनाकडे अभिप्राय मागितले असता त्यावर शासनाकडून काही आले नाही, त्यामुळे आयुक्तांनी सदरचा निर्णय सभेपुढे ठेवला आहे. मनपाने यूजर चार्जची आकारणी बिलात केल्याने ती बंद करावी आणि थकबाकीच्या करावर आकारण्यात आलेले 24 टक्के दंड माफ करावा असा प्रस्ताव नगरसेवक पांडुरंग दिड्डी, जगदीश पाटील, शिवानंद पाटील, विजया वड्डेपल्ली यांनी ठेवला आहे.