सोलापूर- महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली ग्रामविकास खात्याकडे झाल्याचे समजते. त्याचे आदेश अद्याप मिळालेले नाहीत. आदेश मिळण्यापूर्वीच बदलीविरुद्ध आंदोलनांनी वेग घेतला आहे. कामगार संघटना, काही राजकीय पक्ष, सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत.
युतीच्या बैठकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या जनवात्सल्य निवासस्थानी आंदोलन करण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक जगदीश पाटील यांनी मांडली. ती बाजूला सारत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्याचा निर्णय झाला.
‘बसप’चे हलगीनाद
बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महापालिका प्रवेशद्वारासमोर सकाळी हलगीनाद आंदोलन केले. नगरसेवक आनंद चंदनशिवे, उषा शिंदे, सुनीता भोसले आदी सहभागी होते. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांना निवेदन दिले.
शिवसेनेची घोषणाबाजी
शहर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महापौर दालनासमोर घोषणाबाजी केली. महेश धाराशिवकर निषेधाचा डिजिटल फलकच परिधान करून आले होते. या वेळी शहर प्रमुख प्रताप चव्हाण, नगरसेवक भीमाशंकर म्हेत्रे, संतोष पाटील, विष्णू कारमपुरी आदी उपस्थित होते.
काँग्रेसभवनसमोर होमहवन
सोलापूर युवक प्रतिष्ठान, सोलापूर सामाजिक संस्था, हॅप्पी युथ क्लब, र्शीमंतराजे प्रतिष्ठान, शिवराज्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनसमोर होमहवन केले. शांतता भंग केल्याने संघटनांचे राज सलगर, सोहन लोंढे, राम जाधव, सुहास कदम, रविकांत गायकवाड आदी 35 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले. सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थिीत काँग्रेसची बैठक झाल्यानंतर हे आंदोलन झाले.
‘माकप’चा मुख्यमंत्र्यांना फॅक्स
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) बदलीला विरोध केला. पक्षाचे केंद्रीय समितीचे सदस्य, माजी आमदार नरसय्या आडम यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फॅक्स करून बदली रद्द करण्याची मागणी केली. अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
महापालिकेत खुच्र्या फेकल्या
महापौर दालनात डीवायएफआयच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत खुच्र्या फेकल्या. पोलिस येईपर्यंत आंदोलन संपले होते. अजिज पटेल, अशोक बल्लासह सुमारे 50 कार्यकर्ते त्यात सहभागी होते.
अधिकार्यांकडून सर्मथन
गुडेवार कार्यक्षम अधिकारी असून, त्यांची 11 महिन्यांत बदली करणे योग्य नव्हे. नियमाप्रमाणे कमीत कमी तीन वर्षे बदली करता येणार नाही. त्यामुळे त्यांची बदली करू नये, अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाचे जी. डी. कुलथे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.