आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Commissioner, Latest News In Divya Marathi

आयुक्त गुडेवारांना घेरण्याचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिकेत गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा, महापौर अलका राठोड यांच्या घराचे विनापरवाना बांधकाम प्रकरण आणि जबरदस्तीने अधिकार्‍यांकडून स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा प्रकार या तीनही विषयांवर कोणताही निर्णय न घेता मनपाची सभा र्शद्धांजली अर्पण करून तहकूब करण्यात आली. नगरसेवक चेतन नरोटे यांनी महापौरांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
‘शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांची ओरड सुरू आहे. परिणामी निवडणूक काळात फिरणेही अवघड बनले आहे. महापौर मॅडम तुम्ही दुर्गा अवतार घ्या. महापौरांच्या घराची मोजणी चुकीच्या पद्धतीने झाली. बांधकाम परवाना विभागातील उपअभियंता दीपक भादुले यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांना दमदाटी देऊन स्वेच्छानिवृत्ती घेण्यात आली. महापालिकेचे अधिकारी दबावाखाली काम करत आहेत. शहराचे वाटोळे करू नका,’ असे म्हणत गुडेवार यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.
महापालिकेची मार्च महिन्याची सभा गुरुवारी महापौर अलका राठोड यांनी बोलावली होती. सभेच्या सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करण्यास नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी हरकत घेतली. सन 2014-15 मधील तीन कोटीची तरतूद इतिवृत्तात आल्याने त्यास चंदनशिवे यांनी हरकत घेतली. त्यानंतर नगरसेवक सुरेश पाटील, प्रा. अशोक निंबर्गी, प्रा. मोहिनी पतकी यांनी त्यावरून जाब विचारला. नगरसेवक विनायक कोंड्याल यांच्या प्रभागातील सहा कोटींच्या कामाचा त्या इतिवृत्तात समावेश होता.
पाण्यावर अर्धवट चर्चा
शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नगरसेवक चेतन नरोटे यांनी लक्षवेधी घेत प्रशासनाला धारेवर धरले. मागील सभेत पाण्याच्या प्रश्नावर विचारले असता, आजचीच उत्तरे त्यावेळीही देण्यात आली होती. टेंभुर्णीहून नवीन फीडर उजनी येथे घेण्याचे विषय सभागृहात असताना 90 दिवस झाले निर्णय घेतले नाही. सत्ताधारी सभागृहात विषय करत नसल्याचा आरोप नगरसेवक सुरेश पाटील यांनी केला. नगरोत्थान योजनेच्या कामाचा आढावा उपअभियंता लक्ष्मण चलवादी यांनी सभागृहात दिला. त्यानंतर आयुक्तांनी अडचणी सांगितल्या. पाणीपुरवठय़ावर प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता विजय राठोड माहिती देत असताना पाणीपुरवठय़ाच्या विषयास बगल देण्यात आली. पुढे चर्चा न करता अन्य विषय काढले.
दम देऊन स्वेच्छानिवृत्ती
उपअभियंता दीपक भादुले यांना दम देऊन स्वेच्छानिवृत्ती घेण्यात आली. जे झाले ते पाप आहे. महापौर मॅडम शहराचे वाटोळे करू नका. महापालिकेतील अधिकारी दबावात काम करत आहेत. चांगले अधिकारी घरी चालले आहेत. चांगल्या अधिकार्‍यांचा बळी दिला जात आहे. भादुले यांना बोलावून सत्य प्रकार विचारा. मी यापुढे आयुक्तांना हात जोडणार नाही. पदाधिकार्‍यांनी त्यांना बोलावून विचारावे, असे म्हणत नगरसेवक नरोटे यांनी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. भादुले यांच्या विषयावर निर्णय द्यावे अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असे नगरसेवक अनिल पल्ली म्हणाले. आयुक्तांनी केलेल्या कारवाईचे नगरसेवक चंदनशिवे यांनी सर्मथन केले. तो अधिकारी भयावह अवस्थेत आहे, असे प्रा. अशोक निंबर्गी म्हणाले.
तो अधिकार माझा
भादुले यांची स्वेच्छानिवृत्ती मंजूर केली. त्यांना पुन्हा कामावर घेता येते; पण, तो अधिकार सभागृहाचा नसून आयुक्तांचा आहे. मनपात येऊन पोलिस दलात काम केलेले अधिकारी अधिकार्‍यांना दमदाटी करत असेल तर फिर्याद देणे आवश्यक आहे. अन्यथा इतर गुंड मनपात येऊन गोंधळ घालतील. भादुले यांनी यापूर्वी दोनवेळा स्वेच्छानिवृत्ती मागितली होती, ती मी स्वीकारली नाही.’’ चंद्रकांत गुडेवार, महापालिका आयुक्त
महापौर अलका राठोड यांच्या निवासस्थानाबाबत नगरसेवक दिलीप कोल्हे यांनी सभागृहात लक्षवेधी मांडली. महापौरांना दंड आणि नोटीस दिल्याबाबत विचारणा केली. याबाबत महापौर अलका राठोड यांनी सभागृहात सांगितले, ‘माझे बांधकाम नियमात आहे, चुकीचे काही नाही. मला नोटीस आली नाही. याबाबत आयुक्तांशी मी बोलले आहे.’ या विषयावर महापालिका प्रशासनाकडे नगरसेवकांनी माहिती आणि वस्तुस्थिती विचारली नाही. त्यामुळे महापौरांच्या घराच्या विनापरवाना बांधकामाचा नेमका प्रकार काय आहे, हे प्रशासनाकडून स्पष्ट झाले नाही.