आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Amt Service Stop Politics Nagar

राजकीय साठमारीत ‘एएमटी’चा बळी ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिकेने सुरू केलेली एएमटी बससेवा अडीच वर्षांतच बंद झाली. सध्या मनपात शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. सत्ताधार्‍यांना अडचणीत आणण्यासाठी विरोधी पक्षांतील काही नेत्यांनी ती बंद केल्याची चर्चा मनपा वतरुळात रंगली आहे. तसा थेट आरोप आमदार अनिल राठोड यांनी केला आहे. ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर पर्यायी बससेवा देण्याची तयारी भाजपचे नगरसेवक शिवाजी लोंढे यांनी दाखवली आहे. त्याबाबतचे पत्र ते दोन दिवसांत आयुक्तांना देणार आहेत.

बससेवा बंद होण्याची कारणे काहीही असली, तरी सोमवारी कामकाजाच्या दिवशी बससेवा नसल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. रिक्षाचालकांच्या अरेरावीलाही त्यांना तोंड द्यावे लागले.

नगर शहर व उपनगरांसाठी पूर्वी एसटीची शहर बससेवा होती. ती बंद झाल्यावर खासगीकरणातून एएमटी सुरू झाली. परंतु ती फार दिवस चालली नाही. रिक्षाचालकांच्या अरेरावीपुढे ती टिकावच धरू शकली नाही. त्यानंतर सर्व अनुभव जमेस धरून प्रसन्ना पर्पलची सेवा फेब्रुवारी 2011 मध्ये सुरू झाली. बेकायदा रिक्षाचालकांवर कारवाई होऊन नागरिक बसने प्रवास करतील, असे गृहित धरण्यात आले होते. पण रिक्षा व पॅगोचालकांच्या बहुसंख्य संघटना मनपातील विरोधी पक्षातील काही नेत्यांशी संबंधित आहेत. त्यामुळे बेकायदा व नियमांहून अधिक प्रवासी भरणार्‍या पॅगो, तसेच परवान्याविना प्रवासी वाहतूक करणार्‍या पांढर्‍या रंगाच्या रिक्षांवर परिणामकारक कारवाई कधीच होऊ शकली नाही, हे सत्य नगरकरांना माहिती आहे.

सहा महिन्यांनी महापालिकेची निवडणूक होणार आहे. शहर बससेवा हा नगरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. बससेवा बंद झाली, तर त्याचा लाभ विरोधकांना होण्याची शक्यता आहे, असे राजकीय गणित मांडले जात आहे. प्रसन्न पर्पलने नोटीस दिलेल्या तारखेच्या एक दिवस आधीच गाशा का गुंडाळला? त्यांना इतकी घाई का झाली होती? तोट्यातील बससेवा त्यांनी अडीच वर्षे कशी चालवली? कोणताही सत्ताधारी पूर्ण करू शकणार नाही, अशा अवास्तव मागण्या आता करून बससेवा बंद करण्याचे कारण काय? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे अद्याप नगरकरांना मिळालेली नाहीत.

एखाद्या शहराचे आरोग्य तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किती सुदृढ आहे, यावर अवलंबून असते. नगर शहरातील बससेवेद्वारे सुमारे 17 हजार प्रवासी दररोज प्रवास करत होते. आता या प्रवाशांचा ताण रिक्षा किंवा वैयक्तिक वाहनांद्वारे रस्त्यांवर येणार आहे. आधीच अरुंद असलेल्या नगरमधील रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी वाढणार असल्यामुळे अक्षरश: अनागोंदीची स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या काही महिन्यांत शहरातील रस्ते अपघात वाढले आहेत. अपघातांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

..हे तर राजकीय षडयंत्र
एएमटी सुरळीत सुरू राहावी असा आमचा आग्रह आहे. सर्वतोपरी सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. अशा परिस्थितीत बससेवा चालवण्याचे र्शेय सत्ताधार्‍यांना मिळू नये, या हेतूपोटी एएमटी बंद करण्याचे विरोधकांचे राजकीय षड्यंत्र आहे.’’ अनिल राठोड, आमदार.

घाणेरडे राजकारण करत नाही
गेल्या काही महिन्यांपासून एएमटीबाबत चर्चेचे गुर्‍हाळ सुरू होते. सत्ताधार्‍यांनी महापालिकेला कुलूप लावण्याची वेळ आणू नये, ही देवाजवळ प्रार्थना. एएमटी बंद करण्याचे घाणेरडे राजकारण आमच्या रक्तात नाही. असे राजकारण कोण करतंय हे नगरकरांना चांगले माहिती आहे. अपयशाचे खापर दुसर्‍यावर फोडण्याची सत्ताधार्‍यांची प्रवृत्ती आहे. आम्ही मंजूर करून आणलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो, पण अपयश आल्यानंतर हेच सत्ताधारी त्याला राजकारण म्हणतात. संग्राम जगताप, माजी महापौर

रिक्षांसाठी जनता वेठीस
शहरातील पाच हजार रिक्षांसाठी पाच लाख नगरकरांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे. राजकीय लाभासाठी बससेवा बंद करण्यासाठी राष्ट्रवादीच्या लोकांनीच रचलेले हे षडयंत्र आहे. जर संबंधित ठेकेदार बससेवा चालवण्यास तयार नसेल, तर आम्ही आमच्या सहकारी संस्थेमार्फत बससेवा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर चालवण्यास तयार आहोत. ही बससेवा शंभर टक्के यशस्वीपणे चालवू. आमच्याकडे जागा व इतर सर्व पायाभूत सेवा उपलब्ध आहेत. फक्त महापालिकेने सहकार्य करण्याची गरज आहे.’’ शिवाजी लोंढे, नगरसेवक

पुण्यातील चर्चा निष्फळ, आज होणार पुन्हा बैठक
एएमटी सुरू ठेवण्याबाबत सोमवारी पुणे येथे ठेकेदार संस्थेच्या चालकांशी चर्चा केली. मात्र, त्यांच्याकडून उशिरापर्यंत अंतिम निर्णय समजला नाही. याबाबत पुन्हा मंगळवारी (3 जुलै) चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे.’’ शीला शिंदे, महापौर

वैयक्तिक वाहनाशिवाय यापुढे पर्याय नाही..
एएमटी बससेवा बंद झाली. शहरातील रिक्षाचालकांची अरेरावी सहन करण्यापलीकडची आहे. आम्ही उपनगरात राहतो. त्यामुळे बससेवेचा आधार होता. आता मात्र शहरात यायचे असल्यावर इच्छा नसताना स्वत:चे वाहन घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.’’ अनिता बनसोडे, गृहिणी