आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचे कर, बोजा नसलेले कोरडे अंदाजपत्रक मंजूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात मागील वर्षीच्या तुलनेत 110 कोटी रुपयांच्या अधिकच्या उलाढालीचा अंदाज वर्तवित 2013-14 या वर्षासाठीचे सुमारे 825 कोटी रुपयांचे बजेट शनिवारी विशेष अंदाजपत्रकीय सभेत मंजूर झाले. पाणीटंचाईच्या झळा व महागाईच्या चटक्यांनी हैराण झालेल्या शहरवासीयांवर पाणी, मालमत्ता कराचा कसलाच बोजा पडणार नसल्याने दिलासा मिळाला आहे. अंदाजपत्रकात करवाढ नसली तरी एलबीटीचे उद्दिष्ट 200 कोटी रुपयांचे असल्याने व्यापारीवर्गाची चिंता वाढू शकते. मनपा आयुक्तांनी 707 कोटींचे अंदाजपत्रक तयार केले होते. मनपा सभेने ते 825 कोटींपर्यंत वाढविले आहे.

मनपाचे सभागृह नेते महेश कोठे यांनी नेहमीप्रमाणे हास्यवदनाने सदस्यांचे स्वागत करीत बजेटवरील सूचना व शिफारशी मांडण्यास सुरुवात केली. स्थायी समितीचे सभापती इब्राहीम कुरेशी यांनी 737 कोटी रुपयांच्या उलाढालीचे अंदाजपत्रक मनपा सर्वसाधारण सभेकडे सादर केले होते. करवाढ न सुचविता विविध प्रकारच्या उत्पन्न स्त्रोतांची कार्यक्षमतेने वसुली करून उत्पन्न वाढविण्याचा संकल्प सोडला आहे. सत्ताधारी पक्षाने सादर केलेल्या बजेटवर विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर तुटून पडल्या. त्यांनी बजेटवरील उपसूचनेत सत्ताधार्‍यांपेक्षा अधिकचे म्हणजेच 832 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करून कडी केली. एलबीटी व यूजर चार्जेस वसुलीला कडाडून विरोध करीत इतर उत्पन्न स्त्रोतांमधून कर वसूल करून नागरी सुविधा अधिक सक्षमपणे कशा पुरविता येतील अशा आशयाचे त्यांचे भाषण सभागृहाने शांतपणे ऐकून घेतले.

आज परिवहन आणि शिक्षण मंडळाच्या अंदाजपत्रकावर चर्चा
परिवहन व शिक्षण मंडळाचे अंदाजपत्रक रविवारी सायंकाळी पाच वाजता मनपा सभागृहात सादर होणार आहे. त्यानंतर त्यावर सभागृहात चर्चा होईल. प्रदीर्घ कालावधीनंतर शिक्षण मंडळ आणि परिवहनवर चर्चा होत आहे.