आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - प्रशासकीय कामातील गैरवर्तनास जबाबदार धरून महापालिकेचे नगरअभियंता सुभाष सावस्कर यांच्यावर गुरुवारी निलंबन कारवाई करण्यात आली आहे. जीआयएस प्रकरणी मक्तेदारावर कारवाई करण्यास कसूर, शहरातील अतिक्रमणे हटविण्यात हयगय, राजेशकुमार मीना नगर वसाहत प्रकरण अशा विविध 28 प्रकरणांत पदाचा गैरवापर केल्याचे सकृतदर्शनी दिसून येत असल्याचा गंभीर ठपका सावस्कर यांच्याविरुद्ध मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी ठेवला आहे.
महापालिकेच्या विविध खात्यांमधील अभियंत्यांनी बुधवारी सामूहिक स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज सादर केला होता. आयुक्त गुडेवार यांनी पलटवार करीत स्वतंत्रपणे अर्ज दाखल करा, असे सांगून अभियंत्यांच्या दबावतंत्राची हवा काढून घेतली होती. या पार्श्वभूमीवर गुरुवारी थेट नगरअभियंते सावस्कर यांच्यावर निलंबन कारवाई केली. त्यांना आयुक्तांच्या परवानगीविना मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबन कालावधीत खासगी नोकरी स्वीकारता येणार नाही, असेही आदेशात नमूद केले आहे. शिवाय उपअभियंता गंगाधर दुलंगे यांच्याकडे नगरअभियंता पदाचा पदभार सोपविला आहे.
तक्रारींमुळेच कारवाई
नगर अभियंता सुभाष सावस्कर यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी आल्या. 28 प्रशासकीय कामात सकृतदर्शनी हलगर्जीपणा केल्याचे दिसून आले आहे. यामुळेच महापालिकेचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. या सर्व प्रकरणांचा त्यांच्यावर ठपका ठेवून निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांना विभागीय चौकशीला सामोरे जावे लागेल.’’ चंद्रकांत गुडेवार, आयुक्त मनपा
असे आहेत सावस्करांवरील आरोप
- जेआयएस मक्तेदार आशिष देवस्थळी यांच्याविरुद्ध कारवाईत हयगय करून मनपाचे 15 कोटींचे नुकसान.
- केवळ 232 तक्रारींचा निपटारा करून शहरातील 7714 अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केले
- होटगी आणि विजापूर रोडवरील अतिक्रमण हटवण्याकडे दुर्लक्ष केल्याने मनपास आर्थिक तोटा
- बुधवार पेठेतील आरक्षित जागेवरील अतिक्रमणास जबाबदार
- सिंहगड इन्स्टिट्यूटला एन. ए. नसताना बांधकाम परवानगी
- एनमार्टला बांधकाम परवानगी देताना एमआरटीपी कायद्याचे उल्लंघन
- राजेशकुमार नगर उभारणी करताना मनपा कर्मचार्यांची फसवणूक
- 2003 ते ऑगस्ट 2013 अखेर 2484 विनापरवाना बांधकाम उभारले असताना दुर्लक्ष
- 1754 अनधिकृत खोकी टाकली असताना त्याकडे दुर्लक्ष
- अतिक्रमण खात्याकडील पोलिस दलाचा वापर न केल्याने मनपास दरवर्षी कोटीचा भुर्दंड
- नातेवाईक भागीदार असलेल्या साकार कन्स्ट्रक्शनच्या बांधकामाकडे दुर्लक्ष
- शिवाजी साठे यांचे अनधिकृत बांधकाम असताना त्यांना न्यायालयात जाण्यास संधी दिली
- आमदार दिलीप माने यांना नगरोत्थानची माहिती देण्यास विलंब केला
- नगरोत्थान योजनेतील रस्ते विकासासाठी अतिक्रमण काढण्याकडे दुर्लक्ष
- अनुराधा गांधी यांनी केलेल्या अतिक्रमण तक्रारीची दखल घेतली नाही
- अनुराधा सहकारी संस्थेला वेळेत बांधकाम परवाना दिला नाही
- 18 हजार 211 अर्ज बांधकाम परवान्यासाठी आले असताना 1258 अर्जच निकाली, इतर अर्ज 60 दिवसांहून अधिक काळ प्रलंबित
- लिंगशेट्टी, मयूर, बालाजी, मगदूम मंगल कार्यालय व हिराचंद नेमचंद कार्यालयाच्या वाढीव बांधकामास जबाबदार
- पंखा विहीर येथे पंधे कन्स्ट्रक्शनला बीओटी परवानगी देताना जिल्हाधिकार्यांची परवानगी घेतली नाही
- सैफुल चौकात संजय शेळके यांनी पाच फूट फ्रंट साईड कमी करून बांधकाम केले असताना दुर्लक्ष
- सोलापूर आणि यशवंत सहकारी सूतगिरणी येथील 10 टक्के जागा रस्त्याबाजूची न घेता विकासकास मदत
- लक्ष्मी-विष्णू मिल मधील 25 टक्के जागा रस्त्याकडेची न घेता विकासकला मदत
- जुना एम्प्लॉयमेंट चौक, पुणे नाका, लाकूड बाजार, सह्याद्री शॉपिंग बीओटीची कामे मुदतीत करून घेण्यात हयगय
- गुंठेवारीची मुदतीत कार्यवाही, पार्किंगच्या आरक्षित जागेत बांधकामास परवानगी
- प्राणी संग्रहालयातील कामे वेळेत न केल्याने निधी परत जाण्याची शक्यता
- चॅलेंजिंग फंडाची कामे वेळेत करून घेतली नाही.
- राहुल गांधी आणि कुर्बान हुसेन झोपडपट्टीच्या भूखंडाचे आरक्षण उठवण्याचा प्रयत्न केला नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.