आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation City Engineer Subhash Savaskar Dismiss Solapur

मनपा अभियंत्यांचे राजीनामा अस्त्र आयुक्तांनी उलटवले त्यांच्यावरच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिकेच्या आयुक्त कार्यालयात बुधवारी अधिकार्‍यांचे राजीनामा नाट्य चांगलेच रंगले. दबावतंत्र म्हणून एकत्र येत 36 अधिकार्‍यांनी शेवटच्या अस्त्राचा वापर करत सामुदायिक राजीनामे दिले. अनपेक्षितपणे त्याच्या मंजुरीची तयारी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दाखवली. अस्त्र आपल्यावरच उलटल्याचे पाहून अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आणि त्यांनी राजीनामे मागे घेतले.

राजीनामा देणार्‍यात अभियंता आणि उपअभियंता यांचा समावेश होता. सर्वांनी काम करण्यात अडचण येत असल्याची सबब पुढे केली होती. मात्र, नगरअभियंता सुभाष सावस्कर यांच्यावरील कारवाई टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची चर्चा महापालिकेच्या वतरुळात होती.

श्री. गुडेवार यांनी 4 जुलैला पदभार घेतला. तेव्हापासून प्रशासनाच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू केले. त्यामुळे एरवी ‘चलता हेै’ म्हणत वेळ मारून नेणार्‍या अधिकार्‍यांवर काम करण्याचे दडपण आहे. नियमावर बोट ठेवून काम करणार्‍या आयुक्तांपुढे काही चालत नसल्याने अधिकार्‍यांनी शेवटचा पर्याय वापरून पाहिला. त्याचाही उपयोग झाला नाही. दरम्यान, भारतीय जनता पक्ष व बहुजन समाज पक्षाने आयुक्तांना पाठिंबा देत कामचुकार अभियंत्यावर कारवाईची मागणी केली.

सावस्कर, दुलंगे यांचे राजीनामे नामंजूर
नगरअभियंता सुभाष सावस्कर, उपअभियंता गंगाधर दुलंगे यांच्यावर कारवाई करायची असल्याने त्यांचे राजीनामे आयुक्तांनी मंजूर केले नाहीत. 36 पैकी आठ जणाच्या राजीनाम्यांना मंजुरी देण्याची तयारी त्यांनी दाखवली. तर अन्य 28 जणांचे राजीनामे त्यांना नामंजूर केले.

गडबडीत सही केली
मागण्या मान्य करतो, असे म्हणाल्याने राजीनामा मागे घेतला. आयुक्तांच्या वागण्याबाबतच्या निवेदनावर सही मी न पाहाता केली. आमच्यावर कामाचे दडपण आहे.’’ लक्ष्मण चलवादी, उपअभियंता

.. त्यांनी माघार घेतली
काम करताना त्यांना अडचणी येत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. पण, त्यावर उपाय सांगितले होते. त्यापैकी आठ जणांचे राजीनामे मंजूर करण्याची तयारी होती. पण त्यांच्या अडचणीबाबत चर्चा केल्यानंतर त्यांनी राजीनामे आणि रजेवर जाण्याचा निर्णय मागे घेतला.’’ चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महापालिका

राजीनामा देणारे प्रमुख
नगर अभियंता सुभाष सावस्कर, गंगाधर दुलंगे, मोहन कांबळे, आर. एन. रेड्डी, लक्ष्मण चलवादी, एस. डी. मायनळ्ळीकर, एस. व्ही. रेंगळ, ए. व्ही. भालेराव, व्ही. व्ही. चंकेश्वरा, एस. के. उस्तरगी, नीलकंठ मठपती, के. जी. सातपुते, एम. बी. सांगलीकर, एस. जे. ए. एम. काझी, वाय. ए. मुजावर, एस. बी. आलमेलकर, एम. यू. चाकोते, एस. व्ही. एकबोटे, आर. एन. सरकाझी, व्ही. जी. पवार.

राजीनामे मंजुरीची तयारी
दीपक भादुले, आर. डी. जाधव, एस. एम. आवताडे, एच. एस. आदलिंगे, व्ही. बी. जोशी, एस. एन. लामकाने, एस. एस. म्हेत्रे, एम. ए. मुंडेवाडी.

29 जण होते रजेवर
वरिष्ठ अधिकारी नसल्याने काम करणे शक्य होणार नाही, असे म्हणत अभियंत्यांनी गुरुवारपासून सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांनीही माघार घेतली. अर्जावर 44 नावे होती. मात्र, सह्या फक्त 29 जणांच्याच होत्या. महापालिकेत एकूण 81 अभियंता-उपअभियंते आहेत.

आणि त्यांनी काढता पाय घेतला
श्री. गुडेवार यांनी बुधवारी सकाळी नगर अभियंता कार्यालयास भेट दिली. सुभाष सावस्कर यांच्या कामाची माहिती सायंकाळपर्यंत देण्याचे आदेश दिले. त्यात अनेक जण अडकणार आहेत. त्यामुळे सर्व अभियंत्यांनी एकत्र येत सामूहिक स्वेच्छानिवृत्तीच्या अर्जावर आणि सामुदायिक रजेच्या अर्जावर सह्या केल्या. सायंकाळी गुडेवार यांना अर्ज दिले. राजीनामे मंजुरीची तयारी दाखवत श्री. गुडेवार यांनी पर्यायी व्यवस्थेसाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या. रिक्त जागा तातडीने भरण्यासाठी मुलाखतीची जाहिरात देण्याची तयारी केली. काही अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी बोलून उमेदवारांना पाठवण्याविषयी सांगितले. अनपेक्षितपणे वेगाने निर्णय घेत गुडेवारांनी विषय निकाली लावण्याचा प्रयत्न केल्याने अभियंते दंग राहिले. उद्या भेटतो, असे सांगत अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न केला. उद्या कशाला, स्वतंत्र कागदावर राजीनामे द्या, आत्ताच मंजूर करतो, असे सांगत गुडेवार यांनी नमुना अर्जाच्या प्रती त्यांच्या पुढे केल्या. विनवणी करत अभियंत्यांनी अर्ज मागे घेतले आणि मागण्यांचा विचार करण्याविषयी विनंती करत तेथून काढता पाय घेतला.