आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Commission President J.P.Dange Visit Solapur

डांगेंनी थोपटली पालिकेची पाठ; मनपा अधिकार्‍यांसोबत चर्चा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सर्व बाजूने सोलापूर महानगरपालिकेवर टीकेची झोड उठत असताना, पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी जागरूक आहेत. सर्वांचे काम चांगले आहे. परंतु त्यांना आर्थिक पाठबळाची गरज आहे, असे सांगत महाराष्ट्र राज्य चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी पालिकेची पाठ थोपटली.

स्थायी समितीच्या सभागृहात बुधवारी सकाळी 11 वाजता पालिकेस कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर येणार्‍या अडचणींवर विस्तृत चर्चा करण्यात आली. महापौर अलका राठोड, उपमहापौर हारुण सय्यद, सभागृह नेते महेश कोठे, विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर, आयुक्त अजय सावरीकर, परिवहन सभापती मल्लेश बडगू, गटनेते दिलीप कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्री. डांगे पुढे म्हणाले, सोलापूर महानगरपालिकेने काही कामे अत्यंत चांगली केली आहेत ज्याचा आदर्श इतर महानगरपालिकांनी घ्यावा.

आयुक्तांकडून प्रेझेंटेशन

शहर व हद्दवाढ कशी झाली, लोकसंख्या कशी वाढली, शहर पाणीपुरवठा, उजनी जलाशय, टाकळी व हिप्परगा स्रोत, एमएसआरडीसी, नगरोत्थान रस्ते व ड्रेनेजची कामे याबाबत सद्यस्थितीची आयुक्त सावरीकर यांनी पीपीटीद्वारे मांडली. घनकचरा व्यवस्थापन, शून्य कचरा मोहीम, कचर्‍यापासून वीजनिर्मिती, राष्ट्रीय व राज्य सरोवर योजनेतून संभाजी तलाव सुधारणा कामाची माहिती श्री. डांगे यांना दिली.

1 एप्रिल 2011 पासून शहरात एलबीटी लागू करण्यात आली. त्यासंदर्भात येणारी आर्थिक तूट सांगून, ही तूट शासनाने अनुदान रूपात दिली पाहिजे, हे आग्रही मतही सावरीकर यांनी मांडले. तसेच आस्थापना व पेन्शनदारांचा खर्च, 217 कोटी रुपयांची विविध देणी, शहराची वाढती लोकसंख्या आणि परजिल्हा तसेच परराज्यांतून येणार्‍या रुग्णांची संख्या पाहता औषधोपचारासाठी निधी मिळावा, असेही ते म्हणाले.

यावेळी सहाय्यक आयुक्त अजित खंदारे, सहा. आयुक्त महसूल डॉ. पंकज जावळे, मुख्य लेखापरीक्षक अशोक जोशी, नगरसचिव ए. ए. पठाण, मुख्य लेखापाल श्री. गोडगे, नगर अभियंता सुभाष सावस्कर, आरोग्य अभियंता बी. एस. अहिरे, सेवानिवृत्त उपायुक्त पी. वाय. बिराजदार उपस्थित होते.