आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थायी समितीसाठी जुळवाजुळव सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पुढील महिन्यापासून महापालिकेतील विविध समित्या आणि विरोधी पक्षनेता निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मनपा सर्वसाधारण सभेत स्थायी समितीसाठी आठ सदस्यांची नवनियुक्ती करण्यात येणार आहे. स्थायी समितीत दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेले सदस्य नियमानुसार बाहेर जातील आणि संबंधित पक्षांकडून नवीन सदस्यांच्या नियुक्त्या होतील. सदस्य आणि सभापतिपदी आपलीच वर्णी लागावी यासाठी आतापासून राजकीय पक्षांमध्ये लॉबिंग करण्यास सुरुवात झाली आहे.

सत्ताधारी आघाडीच्या करारानुसार काँग्रेसकडे सभापतिपद राहणार आहे. त्यासाठी गोपनीय हालचालींना वेग आला आहे.

सभापतिपदासाठी चढाओढ
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून काँग्रेसकडून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. शहर उत्तर मतदार संघ आणि लिंगायत समाजाचे गणित मांडत उदय चाकोते यांचे नाव सभापतिपदासाठी पुढे येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत कोणतेही पद न मिळालेले बाबा मिस्त्रीही आग्रही आहे. त्यांनी आमदार प्रणिती शिंदे आणि दिलीप माने यांच्याकडे फिल्डिंग लावली आहे. अल्पसंख्याक मतांचा विचार करून त्यांचे नाव पुढे रेटले जाऊ शकते. बदलणारी समीकरणे पाहून ऐनवेळी वेगळेच नावही पुढे येण्याची शक्यता आहे.

गरज अभ्यासू नगरसेवकांची
महापालिकेची आर्थिक नाडी स्थायी समितीकडे आहे. मागील वर्षीचा स्थायीमधील गोंधळ पाहता, तेथे अभ्यासू नगरसेवकांची गरज आहे, असे मत विद्यमान सदस्य सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. माझे राजकीय विरोधक असले तरी चालेल पण जातीधर्माचे आणि राजकीय समीकरण जुळवून सदस्य आणि सभापती निवड होऊ नये. तसे झाले तर शहर अधोगतीकडे जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
नवनियुक्ती सदस्यांची

भाजपमध्ये अधिक इच्छुक
भाजपाचे तीन सदस्य स्थायीतून निवृत्त होणार आहेत. त्यामुळे तेथे इच्छुकांची संख्या जास्त आहे. विजया वड्डेपल्ली, चंद्रकांत रमणशेट्टी, र्शीकांचना यन्नम, मोहिनी पत्की, अविनाश पाटील, सुरेखा अंजिखाने आदी नावे पुढे येऊ शकतात.

दोन ‘महेश’ची भूमिका महत्त्वाची
स्थाथी समितीच्या निवडीत महापालिका सभागृह नेते महेश कोठे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

15 पासून घडामोडींना वेग
फेब्रुवारी महिन्याच्या सभेत नवीन सदस्य निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी 11 फेब्रुवारी दरम्यान सभापत्रिका पुढे येईल तेव्हा राजकीय घडामोडी आणि लॉबिंगला आणखी वेग येईल.

मार्चपासून नवीन सदस्य
20 फेब्रुवारीच्या आत नवीन सदस्य निवड होईल. त्यांचा कारभार एक मार्चपासून सुरू होईल. मार्च महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी नवीन सभापती निवड होण्याची शक्यता आहे.

हे पडणार बाहेर
सुरेश पाटील, शशिकला बत्तुल, नरेंद्र काळे (भाजप), मनोज शेजवाल (शिवसेना), किशोर माडे, पद्माकर काळे (राष्ट्रवादी) आणि सुशीला आबुटे, मेघनाथ येमूल (काँग्रेस).

हे राहणार
शिवानंद पाटील (भाजप), चेतन नरोटे, उदय चाकोते, नागेश ताकमोगे (काँग्रेस), इब्राहिम कुरेशी, गीता मामड्याल (राष्ट्रवादी), दत्तू बंदपट्टे (अपक्ष), आनंद चंदनशिवे (बसप).