सोलापूर - महानगरपालिकेच्या दोन प्रभागातील रिक्त झालेल्या दोन नगरसेवक पदाच्या जागांसाठी पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्या प्रभागातील मतदारांची प्रारूप यादी १२ मे रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर १६ मे पर्यंत सूचना हरकती घेऊन २१ मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
प्रभाग क्रमांक चार (ब)च्या नगरसेविका दमयंती भोसले यांच्या निधनामुळे तर प्रभाग क्रमांक १८ (ब)चे नगरसेवक महेश कोठे यांचे नगरसेवक पद पक्षातंर बंदीमुळे रद्द झाल्याने दोन्ही जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. त्यासाठी मनपा निवडणूक शाखेने काम सुरू केल्याची माहिती मनपा उपायुक्त श्रीकांत म्याकलवार यांनी पत्रकान्वये दिली.