आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Water Supply Issue At Solapur, Divya Marathi

तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यावर महापालिका प्रशासन ठाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- उजनी-सोलापूर जलवाहिनीची दुरुस्ती करून गळतीचे प्रमाण कमी करण्यात आले असतानाही तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्याचे पडसाद शनिवारच्या स्थायी समितीच्या सभेत उमटले. शहरातील नागरिक पाणीटंचाईने हैराण झाले आहेत. नियोजनाअभावी सर्वसामान्यांवर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आता जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा दोन दिवसांआड करा, अशी मागणी करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभात्याग केला, तर दुसरीकडे दोन दिवसांआड पाणीपुरवठा शक्य नाही म्हणत तीन दिवसांआड पाणीपुरवठय़ावर महापालिका प्रशासन ठाम राहिले. त्यामुळे पाण्यावरून पदाधिकारी आणि महापालिका प्रशासनात जुंपल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
‘स्थायी’त सर्वपक्षीय नगरसेवकांचा सभात्याग
शनिवारी बोलवण्यात आलेली सभा सुरुवातीपासूनच वादळी ठरली. सभा सुरू होताच, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपच्या सदस्यांनी पाण्यासाठी गोंधळ घालत दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. 25 मिनिटे हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सर्वच पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला. दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जाईपर्यंत सभा चालवू देणार नाही, अशी भूमिका नगरसेवक चेतन नरोटे, सुरेश पाटील, दिलीप कोल्हे यांनी घेतली. सभागृहातील गोंधळ पाहता नेहमीप्रमाणे र्शद्धांजली अर्पण करून सभा गुंडाळण्यात आली.
स्थायी समितीच्या शनिवारच्या सभेपुढे 181 कोटींची ड्रेनेज लाइन, हुतात्मा स्मृती मंदिर आदी महत्त्वाचे विषय होते. सभा सुरू होताच नगरसेवक सुरेश पाटील यांनी पाण्यावर लक्षवेधी मांडली. विचारलेल्या प्रश्‍नास सार्वजनिक आरोग्य अभियंता वसंत शेटे यांनी उत्तर दिले. पण ते समाधानकारक नसल्याने सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली.

यावेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे, पाटील, कोल्हे, नरोटे, इब्राहिम कुरेशी यांनी आक्रमक भूमिका घेतली. यापुढे सभागृह चालवू देणार नाही, असे नगरसेवक नरोटे यांनी सांगितले. मनपा अधिकार्‍यांच्या गलथान कारभारामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे नगरसेवक चंदनशिवे यांनी सांगितले.
दोन दिवस उशिरा पाणीपुरवठा
वादळी वार्‍यामुळे कोर्सेगाव येथे विद्युत खांब पडल्याने टाकळी पंप हाऊस येथे विद्युतपुरवठा खंडित झाला. त्यामुळे टाकळी पंप हाऊस येथील पाणी उपसा झालेला नाही. याचा परिणाम म्हणून रविवारी आणि सोमवारी शहरात उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती मनपा पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.
पंप ऑपरेटरला धक्काबुक्की; नगरसेवक पाटीलना अटक नाही
भवानीपेठ येथील वॉटर कार्यालयातील पंप ऑपरेटरला धक्काबुक्की केल्याप्रकरणी नगरसेवक अविनाश पाटील यांना शनिवारी अटक झाली नाही. शुक्रवारी भारतचंद्र भुरळे यांनी जोडभावी पोलिसात फिर्याद दिली होती. सायंकाळी पाचच्या सुमाराला हा प्रकार घडला होता. साथीदारासह आलेल्या पाटील यांनी शासकीय कामात अडथळा आणत पंप चालू केला होता.