आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिका अर्थसंकल्प : सत्ताधार्‍यांची आगपाखड; विरोधक गप्पच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील अंदाजपत्रकात नावीन्यता सोडा राणी लक्ष्मीबाई भाजी मंडईच्या ‘बीओटी’चा संकल्प सूचना व शिफारशींच्या माध्यमातून चोर पावलांनी सभागृहात बहुमताने मंजूर झाला आहे. पालिकेच्या कारभारावर सत्ताधारी बाकावरून प्रशासनावर आगपाखड केली जात होती, तर विरोधी बाकावर शांतता होती. उद्या रविवारी शिक्षण, परिवहन अंदाजपत्रक सादर होणार आहे.

महापालिका अंदाजपत्रकानुसार प्रशासन काम करत नाही. वसुलीचा इष्टांक प्रशासन पूर्ण करत नाही. कर, पाणीपुरवठा, बोगस मिळकती, आरोग्य विभागासह प्रत्येक विभागात गोंधळाची परिस्थिती. अशा पद्धतीने शेलकी वाक्ये उच्चारत सत्ताधारी गटातील अनेक ज्येष्ठ नगरसेवकांनी प्रशासनाविरुद्ध नेहमीप्रमाणेच तुतारी फुंकली. बोथट कानांनी ती जणू ऐकून सोडून दिली, असाच भाव सभागृहात होता.

आयुक्तांनी सादर केलेले बजेट फोल ठरले आहे. प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मनपा पदाधिकार्‍यांचे ऐकत नाहीत. स्वत:ही काही नावीण्यपूर्ण काम करीत नाहीत. पावलोपावली प्रशासनाची निष्क्रियता दिसून येत आहे, अशी सडेतोड टीका सत्ताधारी बाकांवरून नगरसेवक अँड. यू. एन. बेरिया, मनोहर सपाटे, अनिल पल्ली आदींनी अनोख्या अविर्भावात केली.
शहरातील नागरिकांना आरोग्याची सुविधा देणारी आरोग्य विभाग बरखास्त करा, अशा स्वरूपाची जहाल मतेही नगरसेवक अनिल पल्ली यांनी व्यक्त केली.

भाजपमध्ये गटबाजी
सत्ताधारी प्रशासनावर आगपाखड करत असताना, विरोधी पक्षात असलेल्या गटबाजीचे पडसाद सभागृहात दिसून आले. नगरसेवक सुरेश पाटील हे बजेटवर लोकाभिमुख भूमिका मांडण्यात चाणाक्षपणा दाखवतात. पण, त्यांनी बजेटवर तोंडच उघडले नाही. जगदीश पाटील यांचा नेहमीसारखा जोश अन् अविर्भाव नव्हता. उपसूचना सत्ताधार्‍यांना मदत करणारी असल्याची उपरोधिक टिपणी नगरसेवक सुरेश पाटील यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केली.

बसप-माकपच्या टोप्या
मनपा बजेटची वेळ सकाळी 11 ची असताना 12.30 पर्यंत सभा सुरू झालीच नाही. त्यामुळे बसप आणि माकपच्या सदस्यांनी महापौर आसनासमोर घोषणाबाजी केली. शहरातील नागरिकांची तहान लक्षात घेऊन पाणीपुरवठा नेहमीप्रमाणे एकदिवसाआड करावा, असा आशय लिहिलेल्या टोप्या परिधान करून सत्ताधार्‍यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

सपाटेंची शाब्दिक बॉम्बफेक
ले-आउटचे तीन कोटी रुपये नगर अभियंता कार्यालयात जमा असताना ते बजेटमध्ये आले नाहीत. आरोग्य खात्यातही तीच अवस्था आहे. त्यामुळे विविध विभागांत गैरव्यवहार होत असताना जबाबदारी कोणाची असा प्रश्न मनोहर सपाटे यांनी केला. विरोधक आपली भूमिका बजावत नाहीत. सत्ताधार्‍यांवर त्यांचा अकुंश दिसून येत नाही. त्यांची उपसूचना ही विसंगती दाखवणारी आहे. व्यापार्‍यांपुढे एलबीटीला विरोध अन् सभागृहात मात्र एलबीटीचे उत्पन्न दाखवून सर्मथन करता. भ्रष्टाचारास संधी मिळेल अशी कामे सुचविता, अशी शाब्दिक बॉम्बफेक सपाटे यांनी केली.

‘दिव्य मराठी’चे अभिनंदन!
पालिकेचे बजेट दोन दिवस व्हावे म्हणून ‘दिव्य मराठी’ने मन्वंतर घडवून आणले. नगरसेवकांना अभिव्यक्त होण्याची संधी ‘दिव्य मराठी’मुळेच मिळाल्याने मी अभिनंदन करते.’’ विजया वड्डेपल्ली, नगरसेविका