सोलापूर - ज्या ठिकाणी ड्रेनेज लाइनची सुविधा नाही अशा ठिकाणी खुल्या गटारी आहेत. शेळगी येथील कुमारस्वामी नगरात खुल्या गटारीतील पाण्याला चर मारून वाट करून देण्याऐवजी महापालिकेने खासगी प्लॉटमध्ये खड्डे करून सांडपाणी सोडले आहे. यामुळे जवळच्या घरांना धोका निर्माण झाला असून दुर्गंधीने नागरिक त्रासले आहेत.
कुमारस्वामी नगर (क) येथे सर्वत्र खुल्या गटारी आहेत. त्या गटारीचे पाणी पूर्वी नाल्यात जात होते. काही दिवसांपूर्वी मुख्य रस्त्यावर मुरुम टाकून रस्त्याचे काम करण्यात आल्याने रस्त्याची उंची वाढली. परिणामी मुख्य गटारीपासून शंभर फुटाअलीकडच्या गटारी बंद झाल्या. पाणी रस्त्यावर साचू लागले. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या खासगी प्लॉटमध्ये पंधरा बाय वीसचे दोन खड्डे केले आणि त्यात गटारीचे पाणी सोडले. खड्डे भरून ते पाणी खुल्या प्लॉटमध्ये शिरले आहे. जवळच्या बांधकामांना धोका निर्माण झाला आहे. तसेच पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
साचलेल्या पाण्यातून चर मारून खुली गटार करण्यासाठी प्रत्येकाला दहा हजार रुपये खर्च येईल, असे कनिष्ठ अभियंता कोडक यांनी सांगितल्याची तक्रार नागरिकांनी केली. अधिकारी आणि नगरसेवक यांच्यातील चर्चा ऐकून कदाचित नागरिकांचा गैरसमज झाला असेल असा खुलासा कोडक यांनी केला.
खुल्या गटारीकरिता उद्याच चर मारून घेऊ. तसेच कुठेही अडचण येणार नाही किंवा कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.'' आर.एम. सरकाझी, झोनअधिकारी