आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिग्मीवरून चाकू हल्ला; एकाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पिग्मीचे पैसे भरण्यावरून झालेल्या भांडणात चाकू हल्ल्यात दोघे पिता-पुत्र जखमी झाले. उपचार सुरू असताना वडिलांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमाराला घडली. ईलाही याकूब शेख (वय ५५, रा. मड्डीवस्ती) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना पावणे अकराच्या सुमाराला मृत्यू झाला. सलीम ईलाही शेख (वय २५, रा. मड्डीवस्ती, जुना तुळजापूर नाका) हे जखमी झाले आहेत. जोडभावी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. पिंटू कोळी, संतोष कोळी (रा. दोघेजण मड्डीवस्ती) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

सलीम शेख हे पिंटू कोळी याच्याकडे पिग्मी जमा करीत होता. ४० हजार रुपये जमा झाले होते. त्यापैकी कोळीने ३७०० रुपये पिग्मी पतसंस्थेत भरले होते. याबाबत शेख यांनी पैशाची विचारणा केल्यानंतर एक महिन्यापूर्वी दोघात वाद झाला होता. तेव्हापासून दोघात कुरबुरी सुरूच होत्या. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमाराला शेख हे कोळीच्या घरी गेले होते. पैशावरून पुन्हा वाद सुरू झाला. पिंटू संतोष या दोघांनी मिळून शिवीगाळ दमदाटी करून चाकूने कमरेवर, मांडीवर, पोटाजवळ वार केले. त्यावेळी शेख यांचे वडील इलाही शेख हे भांडण सोडवण्यासाठी आल्यानंतर त्यांनाही पिंटूने छातीवर चाकूने वार करून जखमी केले. दोघांना उपचाराला दाखल केल्यानंतर ईलाही यांचा मृत्यू झाला. संशयित संतोषला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त एन. बी. कोहिनकर यांनी दिली. परिस्थिती शांत असून, बंदोबस्तही असल्याचे सांगण्यात आले.

तणावाचे वातावरण : या घटनेची माहिती मिळताच मड्डीवस्ती परिसरात तणावाचे वातावरण होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिलमध्ये आणल्यानंतर तणावाचे वातावरण होते.