आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपींच्या अटकेसाठी मृतदेह 3 तास रस्त्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर, मंद्रूप - दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडीतील मल्लिनाथ पांडुरंग पवार (वय 35) या तरुणाचा खून करून मृतदेह रेल्वे रूळाच्या बाजूला टाकून दिल्याचे शनिवारी उघडकीस आले होते. रविवारी याप्रकरणी आरोपींना अटक करण्यासाठी संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी फताटेवाडीजवळील रेल्वे गेटजवळ तीन तास मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन केले. पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

नागेश भीमाशंकर पाटील (वय 22, विद्यानगर, शेळगी), दीपक धमू राठोड (वय 26, कमलानगर, सोलापूर) या दोघांना अटक झाली आहे. मृत पवार हे शेळी राखण्याचे काम करत. त्यांच्या मृतदेह सापडल्यानंतर वळसंग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. रविवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. आरोपींना अटक करण्याच्या मागणीवरून उपसरपंच अनिल चव्हाण, कन्नू राठोड, राजू राठोड यांच्यासह नातेवाइकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन सुरू केले. उपअधीक्षक अशोक जाधव पथकासह घटनास्थळी आले. अटक केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगितले. यानंतर उपअधीक्षक मनीषा दुबुले याही पथकासह घटनास्थळी आल्या. त्यांनीही जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, श्री. जाधव यांनी काही ग्रामस्थांना घेऊन वळसंगला गेले. त्यांच्या माहितीवरून दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. या प्रकरणात दोघांना अटक झाल्याचे सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली होती. वाहतूक जॅम झाली होती. साहाय्यक पोलिस निरीक्षक मुरलीधर खोकले तपास करीत आहेत.

गुन्हे शाखेकडून तपास
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही या प्रकरणात संशयितांची माहितीही घेत आहे. पोलिस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे, फौजदार संजीव झाडे व त्यांचे पथक घटना घडल्यापासून (शनिवार) माहिती घेत आहेत. नेमका खून कशामुळे झाला आहे, याचा उलगडा तपासात होईल, असे श्री. शेवाळे यांनी सांगितले.