आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उतारा एकाचा, अनुदान दुसर्‍याला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शेतात बागा नसतानाही तुळशी (ता. माढा) गावामध्ये शेतकर्‍यांना फळबाग मदतीचे अनुदान वाटप करण्यात आले. पण आणखी कहर म्हणजे सात-बारा उतारा एकाच्या नावे आणि अनुदान मात्र दुसर्‍याच व्यक्तीच्या नावे मंजूर करण्यात आले आहे. शिवाय एकाच शेतकर्‍यांना दोनदा अनुदान मंजूर करण्याचा प्रकारही घडला आहे.

तुळशीतील निवृत्ती सोपान सुरवसे यांचे गावात 157 -1-अ या गटक्रमांकाने 1.76 हेक्टर इतके क्षेत्र आहे. त्यांच्या सात-बारा उतार्‍यावर तशी नोंदही आहे. पण मदतीच्या लाभार्थ्याच्या यादीत 157-1 या गटक्रमाकांवर भारत विशाल सुरवसे अशी दुसर्‍याच व्यक्तीची नोंद आहे. तसेच जवळपास 14 लाभार्थ्यांना या पॅकेजमधून एकदा मदतीचे अनुदान दिले आहे. पण त्यांना दोनवेळेस अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तसेच काही नावेही चुकीची नोंदली गेली आहेत. अभिमन्यू विठ्ठल बोचरे असे गावातील एका शेतकर्‍याचे नाव आहे, पण प्रत्यक्षात अभिमान दिगंबर कोकरे असे भलतेच नाव यादीमध्ये आहे. कृषी पर्यवेक्षक, कृषी साहाय्यक यांच्या कामाच्या बेजबादारपणाचा नमुनाच हा प्रकार पाहिल्यानंतर दिसून येतो. वास्तविक, या मदतीच्या या अनुदान वाटपासाठी शेतकर्‍यांच्या शेतावर जाऊन पंचनामे करणे, संबंधित शेतकर्‍यांच्या सात-बारा उतार्‍यावर तशी नोंद आहे का, याची खातरजमा करून यादी तयार करणे आवश्यक होते. पण बहाद्दर कर्मचार्‍यांनी घरी वा कार्यालयात बसूनच या नोंदी घेतल्याचे आणि पंचनामे केल्याचे या सगळ्या प्रकारावरून दिसून येते. कर्मचार्‍यांच्या या ‘सरकारी’ कारभारामुळे मात्र गरजू शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.


ही आमची चेष्टाच
दुष्काळात तेरावा, अशीच आमची अवस्था झाली आहे. आम्ही खरे पात्र लाभार्थी असताना आम्हाला ही मदत मिळाली नाही, कृषी विभागाने आमची चेष्टाच केली आहे.’’ लक्ष्मण सुरवसे, वंचित शेतकरी, तुळशी

कारवाईबाबत हालचाल नाही
आमच्याबाबत घडलेल्या या प्रकाराबाबत विभागीय आयुक्तांसह, जिल्हाधिकार्‍यांकडे दाद मागितली आहे. कारवाई किंवा आमच्या लाभाबाबत मात्र काहीच हालचाल अजून दिसत नाही. ’’ निवृत्ती सुरवसे, वंचित शेतकरी, तुळशी

उतारे पाहावे लागतील
या संदर्भातील उतारे पाहावे लागतील, नेमक्या या नोंदी काय आणि कशा पद्धतीने घेतल्या गेल्या आहेत. त्यानंतरच त्याबाबत नेमकेपणाने माहिती देता येईल. ’’ शरद सोनवणे, तालुका कृषी अधिकारी, माढा