आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दमाणी’ जुने हजार ड्रेस देणार गरजूंना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आधुनिक शिक्षणाची कास धरून सातत्याने नवे प्रयोग करणाऱ्या दमाणी विद्या मंदिरने यंदा विद्यार्थ्यांचा गणवेश बदलण्याचा निर्णय घेतला. मग जुन्या गणवेशाचे करायचे काय, यावर विचारमंथन झाल्यानंतर ते गरजूंपर्यंत पोचवण्याचे ठरवले. त्यासाठी माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाचे सचिव नंदकिशोर भराडिया यांनी पुढाकार घेतला. आलेले गणवेश स्वच्छ करून, त्याला इस्त्री करण्याचे काम सुरू झाले. आश्रमशाळा आणि इतर शाळांतील वंचित मुलांना ते देणार असल्याचे श्री. भराडिया म्हणाले.

मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना काळाच्या बरोबरीने घेऊन जाण्याचे प्रयत्न संस्थाचालक आणि शिक्षक नेहमीच करतात. दोन वर्षांपूर्वीच ‘इ-क्लासरूम’ही आधुनिक प्रणाली कार्यान्वित केली. त्यानुसार प्रत्येक वर्गात स्क्रीन लावण्यात आले. बालगटांपासून उच्च माध्यमिक वर्गातील मुलांना चित्रमय शिक्षण मिळू लागले. विज्ञानासारखा अवघड विषयही या प्रणालीने विद्यार्थ्यांना सोपा वाटू लागला. त्यावर विद्यार्थ्यांशी हितगूज सुरू झाले. पालकांशीही संवाद वाढवला. त्यांच्याकडून येणाऱ्या सूचनांचे स्वागत करत बदल केले.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात तर आमूलाग्र बदल करण्यात येत आहेत. जसे सुसज्ज क्रीडांगण, मुलांना जेवणासाठी सुविधांचे दालन आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी. या सुविधा देतानाच, मुलांच्या गणवेशावरही संस्थाचालक आणि शिक्षकांनी विचार केला. इंग्रजी माध्यमांच्या धर्तीवरील गणवेश निवडला. त्यावर मुले आणि मुलांना टाय दिले. कॉन्व्हेंटमधील मुले वाटावीत, असा हा गणवेश आहे. अर्थातच पालकांशी विचारविनिमय करूनच तो निवडण्यात आला. जुना ड्रेस शाळेनेच जमा करण्याचे ठरवले. त्यानुसार मे रोजी शाळेत निकाल घेण्यासाठी आलेल्या पालकांनी जुना गणवेश शाळेत जमा केला. इयत्तानिहाय बॉक्स शाळेत ठेवण्यात आले होते. त्यात तब्बल हजार गणवेश जमा झाले. शाळेच्या निर्णयाला पालकाकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला.
पालकांचा मोठा प्रतिसाद
शैक्षणिक अथवा इतर उपक्रम राबवताना पालकांना विश्वासात घेतो. शिक्षक-पालक संघाच्या सभेत तो विषय ठेवून त्यावर सार्वमत घेण्यात येते. यंदा गणवेश बदलण्याच्या निर्णयावर एकमत झाले. जुने गणवेश वंचितांना देण्याचेही ठरले. त्यानुसार पालकांनी मोठा प्रतिसाद दिला. हजार गणवेश जमा झाले. त्या स्वच्छ करून इस्त्री मारून उपेक्षित मुलांना देण्याचे नियोजन केले आहे. शहरातील आश्रमशाळेत त्याचे वाटप केले जाईल.
नंदकिशोर भराडिया, सचिव, माहेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ
बातम्या आणखी आहेत...